Sanju राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनाला एक आठवडा असताना राजकुमार हिरानी यांनी ‘संजू’ चित्रपटातील एक दृश्याची झलक ट्विटरवर शेअर केली आहे. १५ वर्षांपूर्वीच्या मुन्नाभाई चित्रपटातील एक दृश्य या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा साकारण्यात आलं आहे.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ हे दोन चित्रपट वादात सापडलेल्या संजय दत्तच्या आयुष्याला कलाटणी देणारे होते. या चित्रपटाची कथा, त्यातले संवाद, सर्किट आणि मुन्नाभाईची जोडी हे सगळंच प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं होतं. त्यामुळे संजय दत्तच्या बायोपिकमध्ये या चित्रपटाविषयी उल्लेख असला तर नवल वाटायला नको.

तर हिरानी यांनी चित्रपटातली काही सेकंदाची व्हिडिओ क्लिप ट्विट केली आहे. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात संजयनं साकारलेल्या मुन्नाभाईसारखा अगदी हुबेहुब अभिनय रणबीरनं केला आहे. त्यामुळे रणबीरचं विशेष कौतुक होत आहे.

२९ जूनला हा संजू चित्रपट प्रदर्शित होत आहे.