‘लोकसत्ता लोकांकिका’च्या दुसऱ्या पर्वाचा पहिला अंक ठिकठिकाणी उत्साहात रंगला आहे. महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ हा मान मिळवण्यासाठी तब्बल १३० महाविद्यालये स्पर्धेत उतरली आहेत. आठ विभागीय केंद्रांवर प्राथमिक फेरीच्या निमित्ताने तरुणाईचा नाटय़जागर सुरू झाला असून औरंगाबाद, रत्नागिरी आणि नागपूर या तीन शहरांमधून पार पडलेल्या प्राथमिक फेरीला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. २९ सप्टेंबरपासून औरंगाबादमध्ये ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली प्राथमिक फेरी घेण्यात आली. यावेळी पहिल्याच दिवशी तिथे सात एकांकिका सादर झाल्या. सलग दोन दिवस औरंगाबादमध्ये प्राथमिक फेरी घेण्यात आली. यात देवदासींपासून सआदत हसन मंटोपर्यंत अनेक विषय विद्यार्थ्यांनी हाताळले होते. १ ऑक्टोबरला नागपूर केंद्रावर ‘लोकांकिका’चा बिगूल वाजला, तर २ ऑक्टोबरला नागपूरसह, अहमदनगर आणि रत्नागिरीतही नाटय़जागराला सुरुवात झाली. अहमदनगरमध्ये प्राथमिक फेरीत नऊ एकांकिका सादर झाल्या, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मिळून ११ महाविद्यालयांनी रत्नागिरी केंद्रावर झालेल्या ‘लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीत आपली नाटय़कला सादर केली. गेल्या वर्षी चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयाची ‘कबूल है’ ही एकोंकिका महाअंतिम फेरीत दुसऱ्या क्रमांकावर आली होती. त्यामुळे या वर्षीही आपली ठसन कायम ठेवण्याची जबाबदारी रत्नागिरी-सिंधुदुर्गातील ‘लोकांकिका’मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर आहे. या आठवडय़ाच्या अखेरीस मुंबई, पुणे आणि ठाणे केंद्रातील ‘लोकांकिका’च्या प्राथमिक फेरी पूर्ण झाल्यानंतर मग महाराष्ट्राची ‘लोकांकिका’चा मान मिळवण्यासाठीची खरी चुरस सुरू होईल. या वर्षी विद्यार्थ्यांचा केवळ उत्साहच दिसून येत नाही आहे तर त्यांची तयारी आणि एकांकिका सादरीकरणातली व्यावसायिकताही परीक्षकांचे लक्ष वेधून घेते आहे. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय स्पर्धेला गेल्या वर्षीप्रमाणेच ‘अस्तित्व’ या संस्थेची मोलाची साथ आहे, त्याप्रमाणेच ‘टॅलेंट पार्टनर’ म्हणून ‘आयरिस प्रॉडक्शन’ही सोबत आहे. या दोघांबरोबरच ‘९३.५ रेड एफएम’ हे रेडिओ पार्टनर म्हणून तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून ‘लोकांकिका’च्या नाटय़जागरात सहभागी झाले आहेत.