रेश्मा राईकवार

‘माव्‍‌र्हल’ आणि ‘अ‍ॅव्हेंजर्स’नंतर त्यातले कलाकार नेमके कोणकोणत्या चित्रपटांतून दिसणार, याची सध्या लोकांमध्ये उत्सुकता आहे. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचा ‘डॉ. डुलिटिल’ झाला, क्रिस हेम्सवर्थचा ‘मेन इन ब्लॅक’ झाला. आता हल्क फेम अभिनेता मार्क रफेलोच्या नव्या भूमिकेविषयी चर्चा सुरू आहे. ऑस्कर विजेत्या ‘पॅरासाइट’ चित्रपटावर मालिका करण्याचा निर्मात्यांचा विचार सुरू आहे आणि या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी मार्कला विचारणा झाल्याचे बोलले जात आहे. कोरियन चित्रपट ‘पॅरासाइट’ने ऑस्कर पुरस्कारांच्या इतिहासात एक नवा विक्रम रचला आहे. अकॅडमी पुरस्कारांवर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नाव कोरणारा हा पहिला अन्य भाषिक चित्रपट ठरला आहे. आत्तापर्यंतची हॉलीवूडची मक्तेदारी या चित्रपटाने मोडून काढली आहे. बाँग जून हो दिग्दर्शित या चित्रपटावर सहा तासांची मालिका काढण्याचा घाट एचबीओ समूहाकडून घातला जात आहे. या मालिकेसाठी बाँगने आधीच मार्क रफेलोशी बोलणी सुरू केली होती, मात्र ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडेपर्यंत या गोष्टींवर पडदा टाकण्यात आला होता. आता मात्र या ऐतिहासिक विजयानंतर पुढच्या कामाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मात्र, याविषयी अधिकृत माहिती एचबीओ समूहाकडून आलेली नाही. ‘पॅरासाइट’ संबंधित मालिकेबद्दल आत्ताच बोलणं योग्य ठरणार नाही, कारण त्याबद्दलच्या सगळ्या योजना अगदी प्राथमिक स्तरावर आहेत, असे या समूहाने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. यासंदर्भात, मार्कनेही अजून ठोस माहिती देणे टाळले आहे. मार्कला यासंदर्भात विचारले असता, त्याने या चित्रपटाशी संबंधित मालिकेचा भाग व्हायला आवडेल, असं सांगितलं. बाँग हा खूप अप्रतिम दिग्दर्शक आहे. त्याचा चित्रपटही मला खूप आवडला आणि त्याने ऑस्कर सोहळ्यात जे भाषण केले तेही आवडल्याचे सांगत मार्क ने या चित्रपटाशी संबंधित काहीही असेल तरी त्याचा भाग व्हायला आवेडल, असे स्पष्ट केले आहे. पण तो खरोखरच त्या मालिकेत आहे की नाही, याबद्दल अजून तरी काही सांगू शकत नसल्याचे त्याने सांगितले. गोष्टी जोपर्यंत सुरू होत नाहीत, तोपर्यंत त्या आहेत, असे सांगण्यात अर्थ नसतो, असे सांगत तूर्तास तरी त्याने यावर भाष्य करणे टाळले आहे. पण जर या मालिकेबाबतीत सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर नक्कीच मार्कच्या चाहत्यांनाही त्याला या भूमिकेत पाहणे हे पर्वणी ठरणार आहे.

क्रिस हेम्सवर्थचा व्हॅलेंटाईन

काही काही कलाकार जोडपी ही खास असतात, त्यांचं एकत्र असणं, त्यांना एकत्र पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट असते. थॉर फेम अभिनेता क्रिस हेम्सवर्थ आणि त्याची पत्नी स्पॅनिश मॉडेल, अभिनेत्री एल्सा पटाकी हे असंच जोडपं म्हणता येईल. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने क्रिसने पत्नीबरोबरची छायाचित्रे समाजमाध्यमांवरून शेअर के ली आहेत. एल्सा स्वत: उत्तम अभिनेत्री आहे. या दोघांची २०१० मध्ये गाठभेट झाली होती, प्रेमात पडल्यानंतर लगेचच विवाहबंधनात अडकलेली ही जोडी आजही एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाली आहे. मुलं आणि संसार सांभाळून करिअरही यशस्वीपणे सांभाळण्याची कसरत एल्सा करते आहे. नुकत्याच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्याला मुलांना वाढवायचे आहे, त्यांना वेळ द्यायचा आहे, त्यामुळे त्यांना पहिले प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. क्रिस आणि एल्सा यांना तीन मुलं आहेत. या तिघांनाही शाळेत सोडणं, त्यांचा अभ्यास, त्यांच्या आवडीनिवडी सगळ्या गोष्टी आई म्हणून स्वत: करायच्या असल्याने करिअर थोडं मागे पडलं तरी चालेल, अशीच आपली भावना असल्याचे एल्साने म्हटले आहे.  जेव्हा तुम्ही हॉलीवूडमध्ये असता, तेव्हा तुमचं जगच त्या इंडस्ट्रीने इतकं व्यापून जातं की तुम्ही सदासर्वकाळ फक्त काम आणि कामच करत आहात, असं वाटतं. एकदा का तुम्ही इंडस्ट्रीतून बाहेर पाऊल टाकलं की मग तुम्हाला आपण त्यात किती गुंतून पडलो आहोत याची जाणीव होते. आणि मग गोष्टी बदलत जातात, असा आपला अनुभव तिने सांगितला. २०१७ मध्ये तिने ‘फेट ऑफ फ्युरिअस’ आणि २०१८ मध्ये ‘१२ स्ट्राँग’ चित्रपटातून काम केलं होतं. मात्र, घरासाठी आपल्या करिअरच्या ध्येयावर पाणी सोडावं लागलं आहे, याची कबुलीही तिने दिली. या निर्णयाबद्दल पश्चात्ताप नाही, कारण मुलांना मोठं करायचं, त्यांची प्रत्येक गोष्ट आपण करायची हा विचार आपल्या मनात पक्का होता, असं एल्सा म्हणते. हॉलीवूडमध्ये जिथे जोडण्यापेक्षा तुटण्याच्या चर्चाच जास्त रंगतात तिथे ये जोडी सलामत रहे.. अशा सदिच्छा ज्यांच्यासाठी दिल्या जातात त्यातली ही एक जोडी का आहे, हे एल्सा आणि क्रिसच्या छायाचित्रांवरूनही सहज लक्षात येईल.