देशद्रोही असा आरोप करणाऱ्या कंगना रौणतला ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शबाना आझमी आणि जावेद अख्तर देशद्रोही आहेत, असं वक्तव्य एका मुलाखतीत कंगनाने केले होते. यावर देव तुझं भलं करो, असं शबाना आझमी यांनी कंगनाला प्रत्युत्तर दिलं आहे.

एका मुलाखतीत बोलत असताना शबाना आझमी कंगना रनौतच्या देशद्रोही वक्तव्यावर प्रश्न विचारलं असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, ‘जेव्हा देश एकत्र होऊन पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात शहीद जवानांबाबत दु:ख व्यक्त करत आहे. हल्ल्याचा निषेध करत आहे. अशावेळी कंगनाने मला लक्ष्य करून टीका करणे हे धक्कादायक आहे. अशा वेळी वैयक्तिक हल्ल्याला काही महत्व आहे का? देव कंगनाचं भलं करो.’

शबाना आझमी आणि जावेद अख्तर एका कार्याक्रमानिमित्त पाकिस्तानला जाणार होते. मात्र पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी कार्यकम रद्द केला होता. यावरुन कंगनाने त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. कराची आर्ट काॅन्सिलकडून जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना कराची साहित्य महोत्सवाचं आमंत्रण आलं होतं. दोघांनीही हे आमंत्रण स्वीकारलं होतं. यासाठी दोन दिवसांचा कराची दौरा दोघंही करणार होते. मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत या दोघांनीही पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. हा कार्यक्रम २३ आणि २४ फेब्रुवारीला होणार आहे.

काय म्हणाली होती कंगना –

जावेद अख्तर आणि शबाना आझमी देशद्रोही असल्याचं कंगनाने म्हटलं होतं. जावेद अख्तर आणि शबाना आझमी पाकिस्तानशी संस्कृतीचं अदान-प्रदान करतात. हे तेच लोक आहेत जे ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांचं समर्थन करतात. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. तरी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना पाकिस्तानमध्ये कार्यक्रम घेण्याची गरज का वाटली? असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.