पाच हजार वर्षांची प्रदीर्घ आणि गौरवशाली परंपरा असलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतात घराणी आणि गुरू यांना मानाचे स्थान आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या अवकाशात या गुरू-शिष्य परंपरेने अनेक ‘ध्रुव तारे’ दिले आहेत. त्यांचे अढळपद, त्यांचे तेज, आणि त्यांच्या कलेमुळे तेजाळलेल्या लाखो रसिकांची मने.. हा सिलसिलाही अनेक वर्षांपासून चालत आलेला. गुरूचा शागीर्द बनणे आणि या गुरूच्या आशीर्वादानेच आपली पहिली मफील रंगवणे, हा देखील या परंपरेचाच भाग! पृथ्वी एडिफिस प्रस्तुत ‘लोकसत्ता शागीर्द’ या उपक्रमाने हीच परंपरा पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न बुधवारी दादर येथे आणि शनिवारी ठाण्यात केला. या उपक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि शास्त्रीय संगीताच्या आसमंतात दोन नव्या ताऱ्यांचा उदय झाला.
भारतीय शास्त्रीय संगीतात पं. शिवकुमार शर्मा आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर ही दोन नावे पर्वतासमान आहेत. जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका आणि मोगुबाई कुर्डीकर यांच्या शिष्या किशोरीताई आमोणकर यांनी आपल्या गुरूची परंपरा केवळ गिरवण्याऐवजी त्यापुढे जाऊन त्या ज्ञानात भर टाकली. तर, काश्मिरच्या खोऱ्यातील निसर्गसौंदर्याचं प्रतििबब ज्यांच्या रूपात उमटलं आहे, असे पं. शिवकुमार शर्मा! त्यांनी तर काश्मिरमधील एका लोकवाद्याला भारतीय शास्त्रीय संगीतात रूढ केलं आणि त्या वाद्याचा कॅनव्हास प्रचंड करत शेकडो रागांची नक्षी या वाद्याच्या सहाय्याने चितारली.
या दोन दिग्गज गुरूंच्या तालमीत तयार झालेले त्यांचे शागीर्द ताकाहिरो अराई आणि तेजश्री आमोणकर यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ‘लोकसत्ता शागीर्द’मध्ये झाला. ठाणे आणि दादर येथे झालेल्या कार्यक्रमांना रसिक श्रोत्यांनी भरभरून गर्दी केली. एके काळी मफिलीतल्या प्रेक्षकांनी िशपडलेल्या अत्तराच्या घमघमाटाची आणि कलाकाराने उधळण केलेल्या सुरांची जुगलबंदी चालायची. हाच अनुभव ‘शागीर्द’च्या मफिलीत पुन्हा एकदा घ्यायला मिळाला.
शास्त्रीय संगीतातील उगवत्या ताऱ्यांना त्यांच्या गुरूंच्याच आशीर्वादाने एक मंच मिळवून देण्याचा लोकसत्ताचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. या उदयोन्मुख कलाकारांनी आपली तालीम किती पक्की आहे, हे तर दाखवलेच.
पण त्याचबरोबर एक कलाकार म्हणून नवनिर्मिती करून आपल्या कलेला समृद्ध करण्याचे कसबही त्यांच्यात असल्याची पावती मिळाली, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केली.

आजकाल संगीत क्षेत्रात जो काही गलबला सुरू आहे, त्याकडे पाहता संगीतामुळे मन:शांती मिळते, हा समज मागे पडत चालला आहे. पण भारतीय शास्त्रीय संगीत हे अशा गोंधळासाठी नाही, तर शांतीच्या शोधासाठी ओळखले जाते. आपल्याला असलेली ही समृद्ध परंपरा जोपासण्यासाठी गुरू-शिष्य परंपरा खूपच महत्त्वाची आहे. या परंपरेला पुढे नेण्यासाठी ‘शागीर्द’सारखे उपक्रम निश्चितच महत्त्वाचे आहेत. त्यासाठी ‘लोकसत्ता’चे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
– गानसरस्वती किशोरी आमोणकर
पाच हजार वर्षांची परंपरा असलेले भारतीय शास्त्रीय संगीत हे आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीचा आत्मा म्हणजे शास्त्रीय संगीत. या शास्त्रीय संगीतात गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शागीर्द बनण्यासाठीही शिष्य तसा योग्यतेचा असावा लागतो. तो मान सर्वानाच मिळत नाही. पण शागीर्द बनलेल्या शिष्याला गुरू दोन्ही हातांनी भरभरून ज्ञान देतो. अशा शिष्याची पहिली मफिल चांगलीच व्हावी, ही प्रत्येक गुरूची इच्छा असते. आतापर्यंत माध्यमांनी शास्त्रीय संगीताला कधीच महत्त्व दिले नव्हते. पण ‘लोकसत्ता’ने ही गरज ओळखली आणि त्यांनी पहिल्यांदाच ‘शागीर्द’सारखा उपक्रम सुरू केला आहे. असा उपक्रम इतर कुठेही झालेला मी पाहिलेला नाही. एका अर्थाने आमच्या शिष्यांसाठी लोकांसमोर येण्याची खूपच मोठी संधी आहे. ताकाहिरोला जी तालीम मिळाली आहे, त्यानुसार त्याने उत्तम वादन केले. त्याच्या काही खास क्लृप्त्या आहेत. त्यादेखील त्याने अत्यंत सुंदर पद्धतीने साकारल्या. या उपक्रमाला माझे खूप सारे आशीर्वाद!
– पं. शिवकुमार शर्मा

दडपण होते
ज्यांच्याकडून तालीम घेतली, ज्यांनी संतूर वाजवायला शिकवले, नव्हे, नवीन दृष्टी दिली त्यांच्यासमोरच संतूर वाजवताना दडपण नक्कीच होते. पण रसिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हे दडपण काही मिनिटांतच दूर झाले. एवढ्या मोठ्या मंचावर, अशा रसिक श्रोत्यांसमोर आपली पहिलीवहिली मफिल रंगवायची संधी मिळायला भाग्य पाठिशी असावे लागते.
-ताकाहिरो अराई

माईंची बंदिश गायले
माझ्या गुरू किशोरीताई या स्वत: शास्त्रीय संगीतातील एक विद्यापीठ आहेत. त्यांच्यासमोर त्यांच्याच घराण्याचे गाणे गायचे म्हणजे दडपण नक्कीच होते. मात्र माझी पणजी म्हणजेच मोगुबाई कुर्डीकर म्हणजेच माई यांनी रचलेली बंदिश या कार्यक्रमात मी गायली. ही बंदिश शिकतानाच्या अनेक आठवणी आहेत. या मफिलीच्या निमित्ताने त्या आठवणी जाग्या झाल्या. तसेच पहिल्याच मफिलीला एवढे रसिक श्रोते मिळाले.
– तेजश्री आमोणकर