सध्याच्या जमान्यात कुठलाही चित्रपट जास्तीत जास्त आठवडाभर किंवा दोन आठवडे थिएटरमध्ये राहतो. काही वर्षांपूर्वी एक ते दोन महिने एखादा चित्रपट थिएटरमध्ये रहायचा. पण शाहरुख खान आणि काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाने एक आगळा-वेगळा विक्रम रचला आहे. या चित्रपटाने मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर चित्रपटगृहात तब्बल १,२०० आठवडे पूर्ण केले आहेत. मागच्या २३ वर्षांपासून मराठा मंदिरमध्ये या चित्रपटाचा नियमित शो सुरु आहे.

शाहरुख-काजोलची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला. त्यावेळी या चित्रपटाने उत्पन्न आणि लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडीत काढले होते. त्यावेळच्या तरुणाईला शाहरुख-काजोलची जोडी प्रचंड भावली होती. आजही तरुणाईला हा चित्रपट आवडतो. अमरीश पुरी, फरीदा जलाल, अनुपम खेर, सतीश शाह आणि हिमानी शिवपुरी या पात्रांना आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत.

या चित्रपटासाठी चाहत्यांकडून जे भरभरुन प्रेम मिळाले त्याबद्दल शाहरुखने टि्वटरवरुन कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. २३ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास आजही असाच सुरु आहे. राज-सिमरनवर तुम्ही जे इतके वर्ष प्रेम करताय त्याबद्दल तुमचे मनापासून आभार असे शाहरुखने टि्वटमध्ये म्हटले आहे. काजोलनेही टि्वट करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत. युरोपमध्ये सुरु झालेली ही प्रेमकथा पंजाबमध्ये येता येता तिला भारतीय संस्कृतीचा टच मिळतो. या चित्रपटातल्या शेवटच्या सीनला आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. डीडीएलजेची गाणी आजही अनेक प्रेक्षक ओठांवर आहेत.