News Flash

तऱ्हा प्रसिद्धीच्या!

आमिर खान स्वत: आपल्या टीमबरोबर बसून प्रत्येक चित्रपटाचं मार्केटिंग कसं असलं पाहिजे हे ठरवतो.

तऱ्हा प्रसिद्धीच्या!

‘रईस’चं प्रमोशन अगदी आठवडय़ावर येऊन ठेपलं असताना शाहरूख आणि कंपनीचा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा खल सुरू होताच..शाहरूखने चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी काहीतरी खूप वेगळं नियोजन केलं आहे, ते प्रत्यक्षात आणायचं की नाही यावर बराच वेळ घेत, विचारविनिमय करत अखेर त्याच्या मुंबई-दिल्ली रेल्वे सवारीवर शिक्कामोर्तब झालं. स्वत: शाहरूखने ‘मन्नत’च्या बाहेर येऊन माध्यमांना आपण रेल्वेने प्रवास करणार असल्याची माहिती दिली आणि एकच गोंधळ उडाला. त्याची ही रेल्वे सवारी मुंबई, बडोदा आणि दिल्ली अशा तीन शहरांसाठी होती. त्याचं हे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी राजधानीतून जाणं एकवेळ त्याच्या चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरला असेल, पण त्याच राजधानीतून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी, शाहरूखला पहायला रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी होईपर्यंत गर्दी करणाऱ्या लोकांना त्याचा हा प्रसिद्धीचा हव्यास भलताच महाग पडला. आणि मग शाहरूखच्या या अतिप्रसिद्धीच्या हट्टाबद्दल टीके चे सूर उमटले. ज्या चित्रपटाची गेल्या वर्षभरापासून या ना त्या प्रकारे प्रसिद्धी सुरूच आहे त्यासाठी शाहरूखसारख्या सुपरस्टारने असा आटापिटा का करावा?, हा प्रश्न सगळीकडे विचारला जातो आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटांच्या प्रसिद्धीपासून सुरू झालेला हा तंत्राचा प्रवास आता कलाकारांच्या वैयक्तिक प्रसिद्धीवर, त्यांच्या चाहत्यांची संख्या, त्यांच्याशी कलाकारांचा असलेला संपर्क या गोष्टींवर येऊन स्थिरावला आहे. पूर्वी चित्रपटाची प्रसिद्धी व्हायची, आता कलाकारांची प्रसिद्धी केली जाते ज्याचा फायदा पर्यायाने त्यांच्या चित्रपटांना होतो. प्रसिद्धीच्या या बदलत गेलेल्या तऱ्हांविषयी..

एरव्ही कधीही चार्टरशिवाय प्रवास न करणाऱ्या शाहरूख खानला त्या दिवशी रेल्वेचा प्रवास करण्याचा मोह का अनावर झाला?, त्याचं एकमेव उत्तर हे त्यांच्या मागे असलेल्या मोठय़ा चाहत्यांच्या संख्येत आहे. मुळातच आता चित्रपटाची एकसारखी प्रसिद्धी करून काही उपयोग नाही, सतत कुठल्या ना कुठल्या शोजमधून, मुलाखतींमधून चित्रपटाविषयी ओरडण्यात, चित्रपटासंदर्भातील कार्यक्रमांमध्ये लोकांना फारसा रस नसतो. ते त्या ओढीने चित्रपट पाहायला जात नाहीत, हे सत्य आता इंडस्ट्रीला उमगलं आहे. त्यामुळे कलाकारांनी चित्रपटांची प्रसिद्धी करण्यापेक्षा त्यांची वैयक्तिक प्रसिद्धी करणं हे आता जास्त महत्त्वाचं ठरतं आहे. शाहरूख खान, आमिर खान, सलमान खान या तिन्ही आघाडीच्या स्टार कलाकारांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे आणि या चाहत्यांच्या जोरावरच त्यांचे चित्रपट चालत असल्याने विविध माध्यमांतून त्यांच्याशी संपर्क वाढवणं, त्यांच्या समोर येत राहणं हे कलाकारांच्या दृष्टीने आवश्यक झालं आहे. आणि म्हणूनच ‘रईस’साठी शाहरूखनेही रेल्वेतून प्रवास करायचा निर्णय घेतला, अशी माहिती हिंदीत गेली अनेक वर्षे मोठमोठय़ा कलाकारांच्या जनसंपर्काचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. सध्या हिंदीतील झाडून सगळे कलाकार देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये जाऊन स्वत: चित्रपटाची प्रसिद्धी करण्यावर भर देतात. प्रत्येक कलाकाराची प्रसिद्धीची स्वत:ची अशी एक पद्धत आहे. मग आमिर खान स्वत: आपल्या टीमबरोबर बसून प्रत्येक चित्रपटाचं मार्केटिंग कसं असलं पाहिजे हे ठरवतो. तर विद्या बालनसारखी अभिनेत्री चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्या चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेत घुसून देशभर दौरे करते. चित्रपटांच्या प्रसिद्धीचं हे एकूणच समीकरण आता फार बदललं आहे, असं ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी सांगितलं.

याचे गणितच मोठे..

डिजिटल आणि सोशल मीडियाचा व्याप वाढल्यापासून चित्रपटांच्या प्रसिद्धीचे महत्त्व अचानक वाढले आहे. सध्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी म्हणून निर्मात्यांना १० ते १५ कोटी स्वतंत्रपणे खर्चावे लागतात. कलाकारांची वैयक्तिक प्रसिद्धी, त्यांचे ब्रँडिंग करून देणाऱ्या बरखा दत्तानी यांच्या मते फिल्म हे उत्पादन राहिले नसून कलाकार हे अंतिमत: उत्पादन झाले आहेत. बॉलीवूडचा प्रत्येक कलाकार वेगवेगळ्या मार्गाने हल्ली ब्रँडिंग करतो आहे. त्यांच्या चित्रपटांचे ब्रँडिंग किंवा लोगो करताना त्यांच्या चित्रपटांमध्ये काय आहे, त्यांचे उपक्रम नेमके कशा प्रकारचे असतात, याचा तपशिलात अभ्यास क रवा लागतो, असं दत्तानी यांनी सांगितलं. शेवटी कलाकारांची जितकी जास्त प्रसिद्धी होईल तितकाच त्याचा फायदा त्याच्या चित्रपटांना होईल, असे सध्याचे गणित असल्याचे दत्तानी म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 12:33 am

Web Title: shah rukh khan promotes raees in an unusual way
Next Stories
1 पूर्वतऱ्हा..
2 स्वप्नांच्या सौदागरांची ट्रिक आणि रिस्क
3 ‘एक शून्य तीन’ विकृतीची गूढकथा
Just Now!
X