पुणे हे विद्येचे आणि कलेचे माहेरघर आहे. विविध ठिकाणांहून तरुणाई इथे शिक्षणासाठी येत असते. मुंबईप्रमाणेच पुणेही आता ‘डिजिटल हब’ होत असल्याने याच डिजिटलायझेशनच्या मदतीने, सोशल मिडियाच्या माध्यमातून पुणेकरांना पारंपरिक कलेसोबत वेस्टर्न कल्चरमध्येही रस असल्याचा दिसून येते. सध्या तरुणांची पसंती असते ती वेगवेगळे डान्स फॉर्म्स शिकण्याची. आपणही सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं केलंच पाहिजे हा अट्टहास प्रत्येकाच्या मनात असतो आणि नेमकं त्याचप्रमाणे तरुणाई प्रयत्नशील असते.

पुण्यामध्ये भारतभरातून आणि भारताबाहेरून मुले शिकण्यासाठी येतात शिवाय आयटी क्षेत्र येथे झपाट्याने वाढत असल्याने तरुणांची संख्या मोठ्या प्रकारे आहे . शिक्षणाशिवाय आपल्याला वेगवेगळ्या कला शिकता याव्यात यासाठी विविध वर्कशॉप आणि संस्थांशी ही मुले जोडली जातात. पुण्यात खासकरून पारंपरिक नृत्याची शिकवण देणाऱ्या संस्था आणि वर्कशॉप खूप प्रमाणात दिसतात पण क्लासिकल नृत्यासोबतच वेस्टर्न डान्स स्टाइलमध्येही पुण्यात सध्या कुतुहुलता वाढत चालली आहे. म्हणूनच प्रत्येकाला सगळ्यात हटके डान्स स्टाईल शिकायला मिळावी याच्या शोधात हे डान्सवेडे असतात.

अशाच डान्सवेड्या तरुणाईसाठी सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावर खास पुणेकरांसाठी ‘डान्सथॉन’ घेऊन येत आहे. बॉलिवूडमध्ये शामक दावर हे नाव मोठ्या मानाने घेतले जाते. शामक आणि त्याच्या टीमकडून पुणेकरांसाठी प्रत्यक्षात डान्सचे धडे दिले जाणार आहेत. यापेक्षा कमालीची गोष्ट काय असू शकते? पारंपरिक नृत्यशैलीच्या पलीकडे जाऊन काहीतरी भन्नाट डान्स स्टाईल या एकदिवसीय कार्यशाळेत शिकवली जाणार असून यात थिएटर, बॉलिवूड, स्वॅग, जॅझ अशा हटके डान्स स्टाईल शिकायला मिळणार आहेत. दोन वेगवेगळ्या टोकाच्या डान्स स्टाईल एकत्रपणे शिकण्याचा हा अनोखा अनुभव येत्या २५ तारखेला सिम्बायोसिस कॉलेजमध्ये होणार आहे. तर पुणेकरांनो तयार व्हा हटके डान्स स्टाईल शिकण्यासाठी.