श्रीराम ओक

‘मृत्यू’ एक छोटासा शब्द. पण या शब्दाभोवती सारे जग फिरते. या एका शब्दाने अनेकांच्या जीवनात विविध घडामोडी घडतात. काही वेळा त्या थोडय़ा कालावधीसाठी असल्या, तरी ‘मृत्यू’ हा एक शब्द व्यक्तीपरत्वे अनेकांच्या जीवनमानात बदल घडवतो. मृत्यू असतो की नाही? देह नष्ट होतो म्हणजे काय? या वादात पडण्यापेक्षा एखादी व्यक्ती कुटुंबातून, नातेवाइकांमधून, मित्रपरिवारातून कायमची, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी निघून जाणे ही कल्पना करणे देखील अनेकांना नकोसे वाटते. मृत्यू काही वेळा ठरवून येतो, तर काही वेळा क्षणाचीही उसंत न देता तो समोर येऊन ठाकतो. हे सगळे माहीत असूनही माणूस त्याच्या षड्विकारांना ताब्यात मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे सहसा पाहायला मिळत नाही. मृत्यू या शब्दापासूनच नाही तर या विचारांपासून दूर जाण्यालाच अनेकांची पसंती असते. एकदा देह नष्ट झाला, म्हणजेच मृत्यू आला असे काही काळ मानले तर हा नष्ट झालेलाच देह पुन्हा मनुष्यरूपात येण्यासाठी कशी धडपड करतो, यावर भाष्य करणारी एकांकिका म्हणजे ‘पुन्हा एकदा’.

आशयघन एकांकिका म्हणून उल्लेख व्हावा असे राजश्री राजवाडे-काळे यांचे लेखन तर मोजकीच पात्रे पण त्यांचा बहारदार अभिनय एकांकिकेला एका उंचीवर घेऊन जातो. पाच पात्रे आणि प्रत्येक व्यक्तिमत्त्वाची वेगवेगळी कथा, पण त्यांच्यासाठी तर ती केवळ निव्वळ व्यथाच. धडपड मात्र एकच मनुष्याचा जन्म मिळविण्याची. आयुष्य एकदा जगलं की संपलं, या नियमानुसार अनेकांना मृत्यू जवळ आला की पश्चात्ताप होतो, अजून थोडे आयुष्य असते तर.. असे वाटू लागते. आयुष्य वाढवून देण्यासाठी यमाला पैशांची लाच देणाऱ्या माणसाची कथा तर सुपरिचित आहेच. पण या एकांकिकेत माणसे यमाच्या दरबारात पोहोचल्यानंतर आपण आयुष्य जगलोच नाही, अशी विविध कारणे त्याच्या पुढे ठेवतात. आपल्याला पुन्हा एकदा मनुष्यजन्म मिळालाच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. हा आग्रह करताना यमावर स्तुतिसुमने उधळण्यापासून विविध प्रकारे आपणच मनुष्यजन्मासाठी योग्य असल्याची कैफियत आई, आजी, कॉलेज युवती आणि लग्नानंतर फसवली गेलेली तरुणी अशीच सगळीच जण मांडू लागतात. सीमा पोंक्षे यांची गावरान बाज असणारी ठसकेबाज आजी तर कॉलेज युवतीच्या भूमिकेतील ‘मॉडर्न गर्ल’ प्रिया करकमकरने योग्य न्याय देत साकारली आहे. आईच्या भूमिकेतील पद्मजा माने-मोरे यांनी आपली कैफियत मांडली आहे. तर फसविली गेलेली युवती खुद्द लेखिकेने राजश्री राजवाडे-काळे यांनी उभी केली आहे. या सगळ्या बायकांच्या त्रासाने वैतागलेला आधुनिक शैलीतील यम अशोक अडावदकर यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा आवाज एकांकिकेसाठी आवश्यक असलेल्या पोषक वातावरणाची निर्मिती करतो.

खूप जणांना असे वाटत असते, की आपले आयुष्य ‘रिवाइंड’ करता आले आणि ज्या चुका झाल्या आहेत, त्या सुधारता आल्या तर. पण आयुष्याचे ‘रिवाइंड’ होणे ही जशी धूसर कल्पना आहे, तसेच आपण आपल्या चुका दुरुस्त करू शकू ही देखील अवास्तव कल्पनाच असल्याचे विचारांती आताच्या मनुष्यजन्मातील आपण सर्व मंडळी सहजतेने मान्य करू. त्यामुळे चुकाच होणार नाहीत किंवा कमी होतील याची दक्षता घेऊन वागता येऊ शकते का? हा विचार ही एकांकिका देते, पण तेही ‘शुगरकोटेड कॅप्सुल’ च्या मदतीने. निखळ मनोरंजन करीत असताना जगण्याचे भान देणारी ही एकांकिका आपल्या जीवनाला आकार देऊ शकते, इतकी ताकद या एकांकिकेच्या निमित्ताने आपल्याला ‘पुन्हा एकदा’ मिळू शकते.