प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दोस्ताना’ २००८ साली प्रदर्शित झाला. रुपेरी पडद्यावरचं हे त्रिकूट अनेकांना आवडलं. ‘दोस्ताना’ची हटके गोष्ट, त्यातली गाणी त्यातूनही प्रियांकाचं ‘देसी गर्ल’ हे गाणं विशेष गाजलं. या गाण्यामुळेच प्रियांका ‘देसी गर्ल’ हे बिरुद मिरवायला लागली. ‘दोस्ताना’चा सिक्वल येणार ही नक्कीच आनंदाची बाब चाहत्यांसाठी होती. विशेष म्हणजे सिक्वलमध्येही प्रियांका- जॉन- अभिषेक हे त्रिकुट पाहायला मिळावं अशी इच्छा चाहत्यांनी चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरकडे व्यक्त केली होती. मात्र चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.

करणनं ‘दोस्ताना’च्या सिक्वलसाठी प्रियांका नाही तर श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरची निवड केली आहे. या चित्रपटात जान्हवी व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्राही दिसणार आहे. चित्रपटासाठी तिसऱ्या अभिनेत्याचा शोध करण घेत आहे. करणनं काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा सिक्वल काढण्याचा मानस बोलून दाखवला होता. मात्र सिक्वलसाठी दमदार कथानक करणला मिळत नव्हतं त्यामुळे बरीच वर्ष करणचं सिक्वल काढण्याचं स्वप्न काही केल्या आकार घेत नव्हतं. अखेर पुढील वर्षांपर्यंत हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्धार करणनं केला आहे.