काही व्यक्तींमध्ये कोणा एका अदृश्य शक्तीचा वावर असतो किंवा त्या व्यक्तींवर त्या शक्तीचा नेहमीच वरदहस्त असतो असं आपल्याला अनेकदा वाटतं. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाच्या बळावर एक प्रकारचं साम्राज्यच उभं करणाऱ्या मोहम्मद रफी यांच्या बाबतीत चाहत्यांच्या मनात अशीच भावना आहे. चित्रपटसृष्टीत राजेंद्रकुमारपासून देव आनंद आणि शम्मी कपूर यांच्यापर्यंत प्रत्येक अभिनेत्याला आवाज देणाऱ्या, असंख्य चित्रपट गीतांना अजरामर करणाऱ्या मोहम्मद रफी यांचा आज स्मृतीदिन. रफीसाहेबांनी नेहमीच त्यांच्या गायनशैलीने आणि राहणीमानाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. चाहत्यांशी त्यांचं एक प्रकारच हक्काचं नातं जोडलं गेलं होतं.

आज रफीसाहेब आपल्यात नसले तरीही त्यांच्या असंख्य आठवणी आणि कलेचा अप्रतिम नमुना मात्र त्यांच्या अस्तित्वाचाच पुरावा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ज्यावेळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये जनसागर उसळला होता. प्रत्येकाचेच डोळे पाणावले होते. कोणीतरी जवळची व्यक्ती दूर जात असल्याच्याच भावना त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांच्या मनात दाटून आल्या होत्या.

हजारोंच्या संख्येने लोकांनी रफीसाहेबांच्या अंत्ययात्रेला गर्दी केली होती. प्रत्येक वर्गातील चाहत्यांचा त्यात समावेश होता. एका कलाकाराचं मोठेपण नेमकं काय असतं याचीच त्यावेळी अनेकांना प्रचिती आली असावी. असं म्हणतात की, ज्या कब्रस्तानात रफी साहेबांचं पार्थिव दफन करण्यात आलं तेथेही एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. त्यात अनेकांना इजाही झाली होती. पण, फक्त आणि फक्त आपल्या आवडीच्या कलाकाराला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी माघार घेतली नव्हती. अनेकांनी तर आठवण म्हणून त्यांच्या कबरीवरील मातीही उचलून घरी नेली होती.

rafi
rafi

पाहा : मोहम्मद रफी यांचे दुर्मिळ फोटो, ‘जब कभी भी सुनोगे गीत मेरे…’

रफी साहेबांचा वावर, त्यांच्या अस्तित्वाची अनुभूतीच त्या मातीत होती, असं अनेकांचं म्हणणं होतं. कलाविश्वापासून राजकीय विश्वापर्यंत प्रत्येक ठिकाणी मोहम्मद रफी या महान कलाकाराच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करण्यात आलं होतं. आजही अनेकांच्या प्लेलिस्टवर आणि मनावर राज्य करणाऱ्या या कलाकाराविषयी सांगावं आणि बोलावं तितकं कमीच.