उत्तरप्रदेशच्या आग्रा येथे सुरु असलेल्या ताज महोत्सवादरम्यान मंचावरच धक्काबुक्की झाली. प्रसिद्ध गायिका पलक मुछालचा भाऊ पलाश मुछाल आणि गझल गायक सुधीर नारायण यांच्यात ही धक्काबुक्की झाली. कार्यक्रमाचे सांस्कृतिक संयोजक सुधीर नारायण यांनी पलकच्या आईसोबत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जात असून पलकने अर्ध्यावरच शो सोडला.

ताज महोत्सवाचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. पलक कार्यक्रमात गाणे सादर करत होती आणि त्यानंतर सुधीर नारायण यांनी तिच्याकडे होळीचे गाणे गाण्याची इच्छा व्यक्त केली. यावरच तिथे उपस्थित असलेल्या पलकच्या आईचा राग अनावर झाला आणि त्यांनी सुधीर नारायण यांना खडेबोल सुनावले. दोघांमध्ये होत असलेल्या या बाचाबाचीदरम्यानच पलाश सुधीर नारायण यांच्या अंगावर धावून गेला. मंचावरच धक्काबुक्की झाली आणि अखेर कार्यक्रमाच्या आयोजकांना वाद मिटवण्यासाठी पुढे सरसावे लागले.

अखेर आयोजकांनी हा वाद मिटवला, मात्र त्यानंतर रागाच्या भरात पलक तो शो अर्ध्यावरच सोडून निघून गेली. आयोजकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने ऐकले नाही. अखेर या घटनेनंतर कार्यक्रम तिथेच संपवण्यात आला.