मुंबई : गायकांच्या आवाजाची प्रेक्षकांना कायमच भुरळ पडत असते; पण कलाकारांचे सूर कानी पडले तर.. याच संकल्पनेतून साकारलेला  ‘सिंगिंग स्टार’ हा नवा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे यात फक्त कलाकारच नाहीत, तर त्यांच्यासोबत दिग्गज गायकांचेही सूर प्रेक्षकांच्या कानी पडणार आहेत. २१ ऑगस्टपासून हा नवा कार्यक्रम ‘सोनी मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.

गाण्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले नसले तरी आपल्या प्रत्येकाच्याच मनात गाण्याचे बोल गुणगुणत असतात. असेच काहीसे कलाकारांच्या बाबतीतही असते. रोजच्या व्यग्रतेमुळे त्यांना गायनाची आवड जोपासणे शक्य होत नाही, तर काहींना संकोचही वाटतो. याच कलाकारांच्या मनातील गुपिताला सोनी मराठीने वाट करून दिली आहे. ‘सिंगिंग स्टार’ या नव्या कार्यक्रमात कलाकार गाणे गाणार असून त्यांच्या सोबतीला दिग्गज गायकही असतील. कलाकार आणि गायक अशी जोडी असणाऱ्या या कार्यक्रमाचे परीक्षण ज्येष्ठ नट प्रशांत दामले, संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी, गायिका बेला शेंडे करणार आहेत, तर अल्पावधीतच स्वत:ची छाप पाडत मनामनांत घर केलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे सूत्रसंचालन करणार आहे. कलाकार आणि गायक अशा एकूण बारा जोडय़ांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. यात सामील झालेले कलाकार सध्या आपल्या आवाजावर काम करीत असून टाळेबंदीतला वेळ रियाजासाठी देत आहेत.

तारे कोणते?

या कार्यक्रमात अजय पुरकर, आस्ताद काळे, गिरिजा ओक, अर्चना निपाणकर, स्वानंदी टिकेकर, पौर्णिमा डे यांसारखे लोकप्रिय चेहरे आपल्या आवाजाची जादू दाखवणार आहेत, तर रोहित राऊत, वैशाली भैसने माडे, सावनी रवींद्र, अमृता नातू, राहुल सक्सेना आदी गायक मंडळी त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

प्रत्येक कलाकारात एक गायक असतो, पण कामाच्या व्यापामुळे कलाकाराला गायनाकडे वळता येत नाही किंवा अनेकदा मनात न्यूनगंड असतो. सोनी मराठीचा हा पहिलाच सिंगिंग शो आहे. त्यामुळे काही तरी दर्जेदार संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी या विचाराने ‘सिंगिंग स्टार’ची निर्मिती करण्यात आली आहे. कलाकारांच्या मनातले गाणे ओठांवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

अजय भाळवणकर, व्यवसाय प्रमुख, सोनी मराठी