प्रसिद्ध ब्रिटीश संगीतकार अँडी अनोके याला बलात्काराच्या आरोपाखाली २४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१७ मध्ये हॉलिवूड सिनेसृष्टीत ‘#मी टू’ ही चळवळ सुरु होती. या दरम्यान चार महिलांनी अँडीवर लैगिंक अत्याचाराचे आरोप केले होते. तब्बल तीन वर्ष हे प्रकरण कोर्टात सुरु होते. अखेर सबळ पुराव्यांच्या आधारावर कोर्टाने त्या महिलांना न्याय देत, अँडीला २४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

ब्रिटीश न्यायाधीश विल्यम हार्ट यांच्या अंतर्गत हा खटला सुरु होता. द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अँडी अनोकेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “अँडी एक विकृत प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. शिक्षा सुनावल्यावर सुद्धा त्याच्या डोळ्यांत मला पश्चातापाच्या भावना दिसल्या नाहीत. असे हावभाव अट्टल गुन्हेगारांचेच असतात. यापूर्वी देखील अनेक तरुणींनी त्याच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. परंतु पुराव्यांअभावी तो नेहमी सुटायचा. परंतु या प्रकरणात पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारे तपास केला. पुरावे शोधून काढले, परिणामी त्याला गजाआड पाठवणे सोपे झाले.”

अँडी अनोकेला संगीताच्या दुनियेत ‘सोलो ४५’ म्हणून ओळखले जायचे. तो एक नामांकित रॅपर होता. अनेक लहानमोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु गाण्यांसोबतच तो आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळेही चर्चेत असायचा. गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत जवळपास ३० प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्याला पकडलं होतं. मात्र योग्य पुराव्यांअभावी त्याला तो कायम सुटायचा. परंतु या बलात्काराच्या प्रकरणात मात्र तो २४ वर्षांसाठी गजाआड गेला आहे.