सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘काला’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख नुकतीच जाहीर करण्यात आली. रजनीकांत यांचा जावई आणि ‘काला’चा निर्माता धनुष याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधीची माहिती दिली. त्यानंतर सोशल मीडियावरही कालाच्याच चर्चांना उधाण आलं. इतकच नव्हे तर चित्रपटातील त्यांच्या नव्या लूकबद्दलही प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल पाहायला मिळालं. सध्या या चित्रपटातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला असून, तो चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन असल्याचे तर्क लावण्यात येत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रजनीकांत यांच्या आजूबाजूला आग लागल्याचं स्पष्टपणे दिसत असून, ‘काला’च्या रुपात दिसणाऱ्या या सुपरस्टारच्या डोळ्यातही क्रोधाग्नी पाहायला मिळतोय. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये असणारी स्टंटबाजी आणि त्यातही खुद्द रजनीकांत हे स्टंट करत असल्यामुळे अगदी साजेशी साहसदृश्य या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत. ही दृश्य पाहता पुन्हा एकदा या दिग्गज अभिनेत्याच्या दर्जेदार अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे नाकारता येत नाही.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर रजनीकांत यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुख्य म्हणजे येत्या काळात त्यांनी पूर्णपणे राजकारणालाच वेळ दिल्यानंतर चित्रपटसृष्टीतील त्यांचा वावर तुलनेने कमी असे असेही म्हटले जातेय. त्यामुळे ‘२.०’ आणि ‘काला’ या दोन्ही चित्रपटांकडे प्रेक्षकांसोबतच संपूर्ण कलाविश्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ‘काला’च्या निमित्ताने रजनीकांत आणि दिग्दर्शन रंजित यांची जोडी पुन्हा एकत्र आली आहे. ‘कबाली’ चित्रपटाच्या वेळी या दोघांनीही एकत्र कम केलं होतं. त्या चित्रपटाला मिळालेल्या यशाचा अंदाज घेतला तर ‘काला’कडूनही त्याच तोडीच्या अपेक्षा असल्याचं चित्र आहे.