अक्षय कुमारच्या ‘हॉलिडे’ चित्रपटात थेट त्याच्या पाठीवर हात ठेवून सल्ला देणाऱ्या, प्रसंगी रागावणाऱ्या मित्राला पाहिल्यानंतर ‘अरेच्चा! हा तर सुमीत राघवन’ असे उद्गार अनेकांच्या तोंडून बाहेर पडतात. इतका सुमीतचा चेहरा, त्याचा अभिनय प्रेक्षकांना परिचित आहे. गेली पंचवीस वर्ष टीव्ही, सिनेमा आणि रंगभूमी तिन्ही माध्यमांमधून काम करणाऱ्या सुमीतला इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच मराठी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका करायला मिळाली. अतुल काळे दिग्दर्शित ‘संदूक’ या चित्रपटात सुमीत राघवन हिरो म्हणून पहायला मिळणार आहे. मात्र, एवढी वर्ष वाट पहावी लागली तरी आत्ता मराठी चित्रपटांचा प्रवाह पाहता योग्यवेळी आपला हिरो म्हणून प्रवेश झाला असल्याचे सुमीतने सांगितले.
१९८३ साली सुमीतने ‘फास्टर फेणे’मध्ये काम केले होते. त्यानंतर पंधरा वर्ष तो मराठी रंगभूमीवर कार्यरत होता. हिंदीत तर ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘तू तू मैं मैं’ सारख्या विनोदी मालिकांमधून त्याने आपली छाप पाडली. ‘संजीवनी अ मेडिकल बून’ सारख्या वेगळ्या मालिकांमधूनही काम केले. मात्र, मराठी मालिका आणि चित्रपट यांच्यापासून तो नेहमीच दूर राहिला. मराठी मालिकांचे विषय हे अजूनही घरातल्या भांडणांमध्येच फिरतात. त्यामुळे मराठी मालिकांमध्ये काम करण्यात रसच नव्हता. आणि ज्या काळात मी मराठी चित्रपटांकडे वळलो त्यावेळी तिथे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर या चौकडीच्या चित्रपटांचे वर्चस्व होते. त्यांच्या चित्रपटात त्यांच्याबरोबर एखादा तिसरा किंवा चौथा हिरो म्हणून तरूण चेहऱ्यांचा शोध घेतला जायचा. मला तो तिसरा-चौथा पर्याय नको होता. त्यामुळे चांगल्या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठीही इतकी वर्ष वाट पहावी लागल्याचे सुमीतचे म्हणणे आहे.
‘संदूक’ हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा आहे. त्यामुळे देशासाठी लढा, क्रांतिकारक या गोष्टी चित्रपटात ओघाने आल्या आहेत. मात्र, अशा कथेला सहसा विनोदाचा स्पर्श नसतो. ‘संदूक’मध्ये ही कथा विनोदी पध्दतीने हाताळण्यात आली असल्याचे सुमीतने सांगितले. मराठीत आता खूप वेगवेगळ्या विषयावरचे सिनेमे येत आहेत. चित्रपटांचे यशअपयश बाजूला ठेवले तरी तसे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे आता योग्यवेळी सिनेमाचा भाग व्हायला मिळतो आहे, असे त्याला वाटते. सुमीतबरोबर अभिनेत्री भार्गवी चिर्मूले यात नायिकेच्या भूमिकेत आहे. दिग्दर्शक अतुल काळेशी तीस वर्षांपासूनचे संबंध आहेत. ‘संदूक’ सारखा सिनेमा पडद्यावर आणायला खुद्द अतुललाही १२ वर्ष वाट पहावी लागली असल्याची माहितीही सुमीतने दिली. हिंदीत ‘माय नेम इज खान’, ‘यु मी और हम’ सारख्या चित्रपटांमधून काम केलेल्या सुमीतला हिंदीचे कौतूक वाटत नाही. त्यापेक्षा, विनोदी मालिकांसाठी लिहिल्या जाणाऱ्या कथा या अधिक आव्हानात्मक असतात. त्यात विषयांचेही वैविध्य असते. त्यामुळे विनोदी मालिका करायला जास्त मजा येते, असे सुमीत म्हणतो.