राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीत मराठी ‘कासवा’ने पैज जिंकली असली, तरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे मात्र अजूनही अधांतरीच आहे. त्यामुळे आता ‘निर्माते’नामक सशाशी आणखी एक वेगळी पैज ‘कासव’ला लावावी लागणार आहे. त्यानंतरच हा सुवर्णकमळ पुरस्कार विजेता चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहे. मात्र यानिमित्ताने सुमित्रा भावे यांच्याशी बोलून त्यांच्या आजवरच्या चित्रपटांबद्दल मारलेल्या गप्पा..

वास्तव हे कठोर असलं तरी सत्य वर्तवणारं असतं या हेतूने समकालीन विषय लघुपट आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या ‘कासव’ या चित्रपटाला यंदाच्या ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळाचा किताब बहाल करण्यात आला. तसं राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणे या जोडगोळीसाठी नवीन नाही. यापूर्वी त्यांच्या ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘संहिता’, ‘अस्तु’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मात्र यंदा ‘कासव’ला सुवर्णकमळ मिळाल्याने मनोरंजनाच्या पलीकडचे जग दाखवणाऱ्या वास्तववादी चित्रपटांचे यश आहे. आतापर्यंत या जोडीने काही निवडक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या चित्रपटांचे विषय हे मानवी स्वभावाची उकल करणारे असतात. एवढय़ावरच त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्टय़ संपत नाही, तर मानवी स्वभावातील नात्यांची गुंतागुंत, ग्रामीण-शहरी जीवनशैलीसह समाजातील निषिद्ध विषयांवर भाष्य करणारे विषय, ओघवती आणि प्रेक्षकांचा ठाव घेणारी चित्रभाषा आणि ओघवती मांडणी हे त्यांच्या चित्रपटांचे खरे वैशिष्टय़.

सध्याच्या जागतिकीकरण, स्पध्रेच्या युगात सततच्या तणावामुळे नराश्याच्या गत्रेत जाणाऱ्यांचे प्रमाण विलक्षणरीत्या वाढीस लागले आहे. दररोज आत्महत्यांसारखे विषय वर्तमानपत्रांच्या मथळ्यात प्रकर्षांने दिसत आहेत. अशा परिस्थितीत या समस्येचे दीर्घकालीन उत्तर शोधण्याची गरज आहे आणि या गरजेच्या ऊर्मीतूनच ‘कासव’ चित्रपट जन्माला आल्याचे भावे सांगतात. कासव हा तसा अिहसक प्राणी, अगदी त्याच्यावर हल्ला झाला तरी तो निसर्गनियमानुसार प्रतिहल्ला न करता त्याच्या कवचाखाली जातो. अशीच परिस्थिती नराश्याच्या गत्रेत असलेल्या माणसाचीही असते. नराश्याच्या गत्रेत असलेल्या व्यक्तीला समाजाने कसे स्वीकारावे, याचा धडा ‘कासव’ पाहताना मिळत जातो. नराश्यात अडकलेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षित वातावरण समाजात निर्माण होण्याची गरज या चित्रपटातून व्यक्त होते. ही व्यक्ती जशी आहे, तसा तिचा स्वीकार करणे, त्या व्यक्तीचा पस त्याला मिळावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असते. असे या चित्रपटाच्या दिग्दíशका सुमित्रा भावे यांचे निरीक्षण आहे. ‘कासव’ हा चित्रपट एका नराश्येत असलेल्या तरुणाच्या आयुष्याचे चिंतन आहे. या चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले त्याच दिवशी ‘जागतिक आरोग्य दिन’ होता आणि योगायोगाने या वर्षी ‘जागतिक आरोग्य संघटने’ने नराश्य हा विषय घेतला होता. आपल्याकडे मानसिक आरोग्याकडे पुरते दुर्लक्ष होते, हा विचार मनात असतानाच ‘अस्तु’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मानसिक आरोग्य, त्यातही नराश्य या विषयावर चित्रपट करण्याची कल्पना सुचली, असे त्या म्हणाल्या.

लघुपटांपासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास अनेक राष्ट्रीय पुरस्कारांसह आता सुवर्णकमळापर्यंत येऊन ठेपला आहे. ‘दोघी’, ‘दहावी फ’, ‘देवराई’, ‘वास्तुपुरुष’, ‘नितळ’, ‘एक कप चाय’, ‘घो मला असलाच हवा’, ‘संहिता’, ‘अस्तु’ आणि ‘कासव’ असा त्यांचा हा गेल्या दोन दशकांतला विस्तारणारा आणि चकित करणारा प्रवास आहे. प्रेक्षकांना काय हवे आहे यासाठी चित्रपटनिर्मिती करण्यापेक्षा, जे विषय समाजापर्यंत पोहोचायला हवेत, असे विषय शोधणे, त्यावर संशोधन करून त्यातून चित्रपटाचा धागा गुंफण्याची या दिग्दर्शकद्वयींची संपूर्ण प्रक्रियाच निराळी आहे. या निराळेपणाच्या ध्येयाने पछाडलेली एक टीमच या दोघांनी तयार केली आहे, यात तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांचाच समावेश आहे. त्यामुळे चित्रपटाकडे मनोरंजन किंवा अर्थार्जन असे न पाहता प्रबोधन माध्यम म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते आणि त्यातून अधिकाधिक गंभीर विषयांची सोपी उकल करण्यात या सगळ्यांचाच हातखंडा आहे.

राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचे हे चित्रपट महाराष्ट्रातील एका गटाचे आदर्श आहेत खरे, मात्र एवढे मनोहर असूनही महाराष्ट्रातील प्रेक्षकांपर्यंत एवढे चांगले चित्रपट पोहोचत नाहीत, ही खरी खंत आहे. चित्रपटांच्या मार्केटिंगचे तंत्र गेल्या काही वर्षांमध्ये झपाटय़ाने बदललेले आहे. त्यामुळे ‘अस्तु’, ‘कासव’सारखे दर्जेदार चित्रपट निर्माण करूनही, प्रसिद्धीचे आणि मार्केटिंग तंत्र नसल्याने श्रीमंत निर्मातेही मिळत नसल्याची खंत सुमित्रा भावे यांनी व्यक्त केली. चित्रपटाची चळवळ घेऊन परदेशात प्रवास करताना मात्र भावे व सुकथनकरांचा अनुभव वेगळा आहे. भारतामध्ये जरी या चित्रपटांना प्रेक्षक मिळत नसता तरी परदेशातील चित्रपटप्रेमी मात्र आवर्जून त्यांच्या फिल्म क्लबमध्ये सहभागी होतात. परदेशात एखाद्या महोत्सवात किंवा कार्यक्रमात त्यांचे चित्रपट दाखविले जातात, त्या चित्रपटांची तिथे चांगली चर्चा होते. परदेशातील चित्रपट रसिक हा अधिक प्रगल्भ असल्याचे त्या सांगतात. ‘अस्तु’च्या निमित्ताने सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, डॉ. मोहन आगाशे यांनी  बराच प्रवास केला आणि यानिमित्ताने अनेकांपर्यंत हा विषय पोहोचला. छोटेखानी फिल्म क्लबमध्ये चित्रपट प्रदíशत करून, त्यावर प्रेक्षकांशी चर्चा घडवून आणण्याचे कार्य ते गेली अनेक वष्रे करीत आहेत. यातून प्रेक्षक अधिक समृद्ध व्हावा, ही भूमिका असल्याचे त्या सांगतात.

असे असले तरी व्यावसायिक चित्रपटांच्या तुलनेत आपले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत किंवा चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी होत नाही याची त्यांना कधीच खंत वाटत नाही. चित्रपटांचे मूल्य हे त्यांना मिळणाऱ्या प्रेक्षकसंख्या किंवा त्या चित्रपटाच्या व्यवसायावर ठरत नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. आगामी काळात विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीवर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपटनिर्मितीचा मानसही सुमित्रा भावे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला आहे. या दोन्ही प्रभावशाली व्यक्तींचे आयुष्य एका वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची इच्छा आहे.