पॉर्न चित्रपटांना अलविदा करत बॉलिवूडमध्ये कमी काळात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. उत्तम नृत्यकौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर सनीने बॉलिवूडमध्ये तिचं स्थान भक्कम केलं. विशेष म्हणजे चाहत्यांमध्येही तिची लोकप्रियता अफाट आहे. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या सनीला फार मोजकेच मित्र-मैत्रिणी आहेत. एका कार्यक्रमामध्ये सनीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केल्याचं पाहायला मिळालं.

कलाविश्वामध्ये सात वर्ष यशस्वीरित्या प्रवास करणाऱ्या सनीला आजही तिच्या भूतकाळावरुन ट्रोल करण्यात येतं. मात्र या साऱ्याकडे सनी दुर्लक्ष करते. त्यासोबतच ‘मी आधीही आनंदात होते आणि आतादेखील तेवढीच आनंदात आहे’, असं सनीने एका कार्यक्रमात सांगितलं.

“माझ्या भूतकाळावरुन अनेक वेळा मला ट्रोल करण्यात येतं. मात्र मी आता त्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे. मी आधीही आनंदात होते, आणि आताही तितकीच आनंदात आहे. मला फार मित्र-मैत्रिणी नाहीत. आमच्या काही मित्र-मैत्रिणींचा गृप आहे. त्यातच मी समाधानी आहे”, असं सनीने यावेळी सांगितलं.

पुढे ती म्हणते, “आमच्या गृपची एक जागा आहे, जेथे आम्ही सारे जण भेटायचो. मात्र आता मला तेथे जाणं शक्य होतं नाही, परंतु माझा मित्र परिवार माझ्या संपर्कात आहेत. मी फार कमी वेळा पार्टीजमध्ये सहभागी होते. परंतु आता माझ्या आयुष्यातील सुंदर काळ सुरु आहे, असं मला वाटतं”.

दरम्यान, सनीने ‘जिस्म २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सनीने २०११ साली डॅनियल वेबरसोबत लग्न केलं. २०१७मध्ये तिने लातूरमधून निशा नावाच्या लहान मुलीला दत्तक घेतलं. त्यानंतर ती सरोगेसी पद्धतीने दोन मुलांची आई झाली. त्यामुळे सध्या सनीने तीन मुलांचं पालकत्व स्वीकारलं आहे.