ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना मंगळवारी ब्रेन स्ट्रोक आला. त्यांना जुहूमधील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरेखा यांना रुग्णालयात दाखल केल्याचं समजताच ‘बधाई हो’ या चित्रपटातील त्यांचे सहकलाकार गजराज राव आणि दिग्दर्शक अमित शर्मा त्यांच्या आर्थिक मदतीसाठी धावून आले.

सुरेखा यांना सकाळी ज्युस पित असताना अचानक ब्रेक स्ट्रोक आला अशी माहिती त्यांच्या नर्सने दिली. सुरेखा यांच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याचंही तिने सांगितलं. त्यानंतर अनेक कलाकार त्यांची आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

दोन वर्षांपूर्वीही आला होता ब्रेन स्ट्रोक

२०१८ मध्येही त्यांना ब्रेक स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांच्या देखभालीसाठी एका नर्सची नियुक्ती करण्यात आली. ‘बधाई हो’ नंतर सुरेखा यांना कोणता मोठा प्रोजेक्ट मिळाला नाही.

सुरेखा यांनी १९७८ मध्ये ‘किस्सा कुर्सी का’ या राजकीय चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यांनी नाटकांत आणि मालिकांमध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘बालिका वधू’ या प्रसिद्ध मालिकेतील त्यांनी साकारलेली दादीसा अजूनही प्रेक्षकांना चांगली आठवतेय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुरेखा यांना अभिनयाप्रती प्रचंड आवड आहे.