दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत व अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या फोन कॉल्स डिटेल्सनंतर आता आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, रिया मुंबई पोलिसांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. रियाने वांद्रे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती या वृत्तवाहिनीने दिली. चार फोन कॉल्स आणि एक एसएमएसद्वारे या दोघांमध्ये संपर्क झाल्याचं कळतंय. मात्र या फोन कॉल्सची वेळ आणि मेसेजद्वारे दोघांमध्ये काय बातचित झाली हे अजून कळू शकलं नाही.

सध्या रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. ईडीच्या चार अधिकाऱ्यांकडून गेल्या काही तासांपासून रियाची चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित आहेत.

आणखी वाचा : श्रुती मोदी आहे तरी कोण? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा

सुशांतच्या बँक खात्यातून रियाने १५ कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. या आरोपांबाबत ईडी रियाची चौकशी करु शकते. रिया आणि शौविक यांनी काही कंपन्या स्थापन केल्या आहेत. मात्र, या कंपन्यांचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. या कंपन्या मनी लॉन्ड्रिंगसाठी स्थापन करण्यात आल्या होत्या का? या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन होतं का? असे सवाल ईडीकडून उपस्थित करण्यात आले आहेत.