स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत नुकतंच एका खास पाहुण्याने हजेरी लावली. हा पाहुणा आहे सुप्रसिद्ध गायक-संगीतकार स्वानंद किरकिरे. अक्षय कुमारची प्रस्तुती असलेल्या चुंबक सिनेमाच्या प्रमोशनसाठी स्वानंद ‘नकळत सारे घडले’च्या सेटवर आले होते. या सिनेमात ते प्रसन्ना ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. हाच प्रसन्ना आणि मालिकेतल्या प्रिन्स दादाची योगायोगाने भेट होते. त्यांच्यात गप्पाही होतात. झटपट पैसा कमावण्याच्या नादात कसं नुकसान होतं याचे धडेच प्रसन्ना प्रिन्सदादाला देतो. त्यामुळे प्रिन्स दादाचे डोळेच उघडतात. हा प्रसन्ना म्हणजे खुद्द स्वानंद किरकिरे… आपल्या अफलातून अभिनयानं स्वानंद किरकिरे यांनी ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील प्रसंग रंगवला आहे. त्यामुळे हा भाग मनोरंजक होणार हे नक्की.

स्वानंद यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झालंय. शूटिंगपूर्वी खूप दडपण होतं मात्र स्वानंद यांनी मला खूप धीर दिला आणि शूटिंग सहजरित्या पार पडले, असे प्रिन्सची भूमिका साकारणा-या आशिष गाडेने म्हटले.

#HappyPhirrBhagJayegi : सोनाक्षीचा हॅपी अंदाज प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास सज्ज

सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसात वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ‘नकळत सारे घडले’ ही मालिका प्रसारित होते.