राष्ट्रीय पुरस्कारांची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली. शेखर कपूर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या एका समितीने यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठीच्या चित्रपटांची निवड केली आहे. यामध्ये मराठी चित्रपटांचीही उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून ‘मयत’ची निवड करण्यात आली. या लघुपटाचा राष्ट्रीय़ पुरस्कार जाहीर झाल्यापासून अनेकांच्याच मनात त्याविषयी कुतूहलाची भावना पाहायला मिळाली.

‘मयत’विषयी असणारं हेत कुतूहल आणि उत्सुकता शिगेला पोहोचली असताना अखेर या लघुपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुयश शिंदे दिग्दर्शित या लघुपटाची अवघ्या काही सेकंदांची झलक एका दाहक वास्तवाची जाणीव आपल्याला होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावरुन म्हणजेच मयतावरुन ओवाळून टाकण्यात आलेल्या पैशांविषयी एखाद्या मुलगा आपल्या वडिलांना काही प्रश्न विचारतो, त्यानंतर त्याची समजूत काढण्यासाठी म्हणून ते पैसे उचलायचे नाहीत. नाहीतर पाप लागतं, असं सांगणाऱ्या वडिलांची करुण कहाणी या लघुपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं दिसत आहे.

वाचा : हॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रालाही बसली वर्णद्वेषाची झळ

‘मयत’विषयी उत्सुकता लागून राहिलेल्यांसाठी हा टीझर एक खास भेट ठरत आहे असं म्हणायला हरकत नाही. आता सर्वांचच लक्ष या लघुपटाकडे लागून राहिलं आहे. कलाकारांचा अभिनय आणि राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवणाऱ्या या लघुपटाला प्रेक्षकांचा कसा प्रसिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.