19 April 2019

News Flash

उपेन पटेलचा करिश्मावर हल्ला बोल

उपरोधिकपणे मानले करिश्माचे आभार

‘नच बलिये, ‘लव्ह स्कूल’ या कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आलेली कलाकार जोडी म्हणजे करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल. ‘बिग बॉस’च्या घरात या दोघांच्याही प्रेमाचे सूर जुळले आणि मग ‘नच बलिये’च्या निमित्ताने या जोडीने अनेकांच्या मनावर राज्य केले. इतकेच काय तर उपेनने ‘नच..’ च्या मंचावर करिश्माला लग्नाची मागणीही घातली होती. टेलिव्हिजन विश्वात या दोघांच्याही प्रेमाला उधाण आलेले असतानाच काही कारणास्तव त्यांच्या नात्यात वादाची ठिणगी पडली आणि ही जोडी वेगळी झाली. एकमेकांच्या वाटा वेगळ्या होऊनही उपेन-करिश्मामध्ये असलेला वाद आणि त्यांच्यात उडणारे खटके काही थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. याचाच प्रत्यय नुकताच उपेनने केलेल्या ट्विट्समधून आला.

उपेनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन करिश्माच्या ट्विटर हॅण्डलचा उल्लेख करत काही ट्विट केले. दोन फोटोंसह उपेनने केलेले हे ट्विट चर्चेचा विषय ठरले खरे. पण, काही वेळाने त्याच्या अकाऊंटवरुन डिलीट करण्यात आले. या ट्विटमध्ये उपेनने त्याचा वापर केल्याबद्दल करिश्माला उद्देशून उपरोधिकपणे तिचे आभार मानले आहेत. त्यासोबतच दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, ‘नेहमीच तुम्ही अंतर्मनाचा आवाज ऐका. कारण ज्यावेळी, तुम्हाला काहीतरी वाईट होणार आहे असे वाटते त्यावेळी तसेच होते’. अशा प्रकारे जाहीरपणे करिश्माचा उल्लेख करत ट्विट केल्यामुळे करिश्मा-उपेनमधील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपेनने जरी हे ट्विट त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन डिलीट केले असले तरीही फोटोच्या रुपात सध्या हे ट्विट व्हायरल होत आहे.

upen

दरम्यान, उपेन आणि करिश्माच्या नात्यामध्ये दुरावा येऊन आता बरेच महिने उलटले असले तरिही त्यांच्या नात्यातील गैरसमज लवकरच दूर होऊन हे दोघेही पुन्हा एकत्र येतील अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण, तसे काहीही झाले नाही. उलटपक्षी या दोघांनीही एकमेकांवर निशाणा साधत नव्या चर्चांना वाव दिला आहे असेच म्हणावे लागेल. उपेनसोबत ब्रेकअपनंतर बराच काळ स्वत:ला ‘सिंगल’ म्हणवणारी करिश्मा तन्ना सध्या एका टेलिव्हिजन कलाकाराला डेट करत असल्याचे म्हटले जातेय. ‘नागार्जुन’ या मालिकेतील अभिनेता पर्ल वी पुरीसोबत करिश्माचे नाव जोडले जात आहे. त्यामुळे प्रेम, राग आणि एकमेकांकना डिवचण्याच्या या प्रकरणाला आता नेमके काय वळण मिळणार, उपेनच्या या ट्विटवर करिश्माची काय प्रतिक्रिया असणार याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे.

First Published on March 21, 2017 11:41 am

Web Title: television actor upen patel accuses his ex girlfriend karishma tanna on twitter photos gone viral