लोकसभा निवडणुकांच्या काळात सर्वाधिक नागरिकांनी मतदान करावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलाकारांना जनजागृती करण्याचं आवाहन केलं होतं. बॉलिवूडमधल्या कलाकारांना आजची पिढी सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो करते, त्यांचं अनुकरण करते. या कलाकारांच्या मतांचा प्रभाव जनतेवर होतो. म्हणून मोदींनी कलाकारांना जनजागृती करण्याचं आवाहन सोशल मीडियाद्वारे केलं होतं. मोदींच्या या आवाहनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी मतदारांसाठी सोशल मीडियावर ट्विट केलं. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्टसुद्धा होती. पण यंदा लोकसभा निवडणुकीसाठी आलिया स्वत: मतदान करू शकणार नाही.

आलिया तिच्या आगामी ‘कलंक’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिला मतदान करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, मी मतदान करू शकणार नाही, असं उत्तर तिने दिलं.

आलियाकडे भारतीय पासपोर्ट नाही. ती आणि तिची आई सोनी राजदान हे ब्रिटीश नागरिक आहेत. भारत कोणालाही दुहेरी नागरिकत्व बाळगण्याची परवानगी देत नाही. आलियाने तिचं ब्रिटीश नागरिकत्व सोडल्यानंतरच तिला मतदानाची परवानगी मिळू शकते. म्हणूनच ती मतदान करू शकणार नाही.

याआधी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांदरम्यान आलियाने ब्रिटीश पासपोर्ट असल्याने मतदान करू शकत नसल्याचं सांगितलं होतं. तेव्हा तिने पुढच्या वेळी वोटींग कार्ड मिळवेन असंसुद्धा सांगितलं होतं. मात्र यंदाही ती मतदान करू शकणार नाहीये.

मतदान करू न शकणारी आलिया एकटीच सेलिब्रिटी नाही. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारसुद्धा भारतात राहून मतदान करू शकत नाही. अक्षयकडे कॅनडियन पासपोर्ट असल्याने तो इथं मतदान करू शकत नाही. दीपिका पदुकोणकडेही डेनिश पासपोर्ट आहे.