बॉलिवूडमध्ये सध्या रिमेकचा जोरदार ट्रेण्ड सुरु आहे. बऱ्याच जुन्या गाण्यांचे रिमेक नव्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र, जुनं तेच सोनं असं अनेकांचंच मत आहे. याला कारण म्हणजे, ‘बागी २’ या आगामी चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाणं. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटातील या गाण्याचं रिमेक करण्यात आलं असून जॅकलीन फर्नांडिस रिमेकमध्ये थिरकताना पाहायला मिळत आहे. मात्र, हा रिमेक पाहून अनेकांनीच नाराजी व्यक्त केली असून आता ‘तेजाब’चे दिग्दर्शक एन. चंद्रा हेसुद्धा रिमेकवर भडकले आहे. नव्या गाण्यात नृत्याऐवजी अश्लिलतेचंच चित्रण केल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया असून याविरोधात तक्रार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दो तीन’ या गाण्यातील माधुरी दीक्षितच्या अदा आणि तिच्या नृत्यकौशल्याची सुरेख झलक पाहायला मिळाली होती. सरोज खान यांनी त्या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. रिमेकमधील जॅकलीनचे नृत्य आणि अदा पाहून सरोज खान यांनाही धक्का बसला. आपल्याला हे गाणं अजिबात पटलं नसून त्याविरोधात तक्रार करणार असल्याचं मत त्यांनी दिग्दर्शक चंद्रा यांच्याकडे मांडलं.

वाचा : बिग बींसाठी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची शूटिंग ठरतेय त्रासदायक?

‘रिमेक केलेलं गाणं मला बघवतसुद्धा नाही आहे. मी कल्पनाही करु शकत नाही इतक्या वाईट पद्धतीने चित्रण करण्यात आलं आहे. एकीकडे माधुरीचे नृत्यकौशल्य आणि तिच्या अदा पाहा तुम्ही आणि दुसरीकडे हे नवीन गाणं, फरक तुम्हालाच लक्षात येईल. एखाद्याच्या मूळ गाण्याची अशाप्रकारे मोडतोड करून सादरीकरण करणं आजकाल सहजसोपं झालं आहे, कारण त्याविरोधात कोणताही योग्य कायदा नाही. आर.डी.बर्मन यांच्या ‘दम मारो दम’ या गाण्याचीही अशाचप्रकारे मोडतोड करण्यात आली होती,’ अशा शब्दांत चंद्रा यांनी संताप व्यक्त केला.

सरोज खान आणि चंद्रा मिळून या रिमेकविरोधात तक्रार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सोशल मीडियावरसुद्धा या नव्या गाण्याबद्दल नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.