ऐंशीच्या दशकात ‘मने प्यार किया’ पाहून सुमन आणि प्रेमची फ्रेंडशीप, त्यातून फुलत गेलेलं त्यांचं प्रेम पाहून आपलंही असंच जिवाभावाचं कोणीतरी असावं या भावनेने भारून गेलेली तरुण मनं जशी होती तसंच प्रेम म्हणजे काय हे धड आकळायचं वय नसलेल्या शाळकरी मुलांवरही सलमानच्या ‘प्रेम’ची आणि साध्याभोळ्या सुमनची भारी छाप पडली होती. फक्त पहिल्याच नजरेत जिला पाहून आपली विकेट पडली तिच्या मागे मागे फिरणारं आपलं जग म्हणजे पहिलं प्रेमच होतं हे स्पष्टपणे समजण्याची आणि त्यातली गंमत उलगडून सांगण्याची बुद्धी मोठय़ा अन्यामध्ये आली आहे. आणि हेच पहिलं प्रेम पुन्हा आयुष्यात आल्यानंतर पुन्हा एकदा तिला लपूनछपून बघणारा अन्या तो मीच.. याची कबुली देणाऱ्या दोन पिढय़ांना सहजगत्या एकाच प्रेमकथेत पकडून ठेवणारा हा पहिल्या प्रेमाचा दुसरा सच्चा पार्ट कमालीचा हिट आहे.

प्रेम हे वैश्विक सत्य. ते तुमचं आमचं सेम असलं तरी प्रेमाच्या अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण कधी स्वत:शीही कबूल केलेल्या नसतात. इथे अन्या म्हणजे अनिरुद्ध देशपांडे याच्या रूपाने त्याच्या वयाच्या तिन्ही टप्प्यांमधून जाताना प्रेमाची तीच गोष्ट दिग्दर्शकाने त्या वयातील भावभावनांसह तितक्याच सच्चेपणाने, कुठलाही आडपडदा न ठेवता मांडली आहे. प्रेमकथा हाताळण्यातील हातोटी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी आधीच सिद्ध केली होती. इथे तर नावापासूनच या खेळातील आपण पुराने खिलाडी असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. ‘ती सध्या काय करते’ हा विचार म्हणजे पहिल्या प्रेमाच्या या हळव्या भूलभुलयात घेऊन जाणारा छोटा दरवाजा आहे. या चित्रपटाचा नायक अन्या (अंकुश चौधरी) आपल्याला त्या दरवाजातून त्याकाळी चाळ-कॉलनीतून बालपण अनुभवणाऱ्या छोटय़ा अन्यापर्यंत (हृदित्य राजवाडे) नेऊन सोडतो. अन्याचं बालपण, मध्यमवर्गीय संस्कारात वाढणारा अन्या, त्याचे आई-वडील-भाऊ असं चौकोनी कुटुंब आणि दुसरीकडे कॉलनीत नव्याने आलेल्या तन्वीचं (निर्मोही अग्निहोत्री) थोडंसं श्रीमंत त्रिकोणी कुटुंब. त्यांच्या प्रेमाची गोष्ट सांगताना ऐंशीच्या दशकातील जीवनमान दिग्दर्शकाने इतकं कमालीचं हुबेहूब रंगवलं की प्रेक्षकांची एक पिढी स्मरणरंजनात रमली नाही तरच नवल.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
janhvi kapoor walked barefoot with boyfriend shikhar pahariya mother smruti shinde
Video: जान्हवी कपूरचं ठरलं? बॉयफ्रेंडच्या आईसह अनवाणी चालत गेली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, प्रणिती शिंदेंचा भाचा आहे शिखर
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

चित्रपटाचा हा पहिला भागच खूप ताजंतवानं करतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खरं म्हणजे अन्या-तन्वीचा तरुणपणीच्या प्रेमाचा प्रवास विस्ताराने इथे येणार. पण ठोकळेबाजपणे तो पुढे न नेता दिग्दर्शकाने तरुणपणीचा अन्या आणि मोठय़ा अन्याची कथा एकात एक गुंफत रंगवून सांगितली आहे. त्यामुळे ही प्रेमकथा प्रेक्षकाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. एका नकळत्या टप्प्यावर समज-गरसमजांच्या गोंधळात दूर गेलेल्या प्रेमाचा प्रामाणिकपणे स्वीकार करताना ते तन्वी आणि अन्या कशा पद्धतीने पुढे नेतात, हा या चित्रपटाचा कळसाध्याय आहे जो चित्रपटातच पाहायला हवा. या चित्रपटाची जान त्याच्या मांडणीत आहेच, पण मुळात पटकथेच्या पातळीवरच हा विषय खूप समजूतदारपणे आणि संवेदनशीलतेने मांडला आहे. त्याचे श्रेय लेखिका मनस्विनी लता रवींद्रला द्यायलाच हवे. अन्याच्या स्वभावातील मूळचा भित्रेपणा, त्याची धरसोड वृत्ती, एका टप्प्यावर तन्वीला गृहीत धरून आपल्याच विश्वात रमणारा अन्या आणि त्याला मुळातच समंजस असलेल्या तन्वीची साथ यातून ज्या गोष्टी घडल्या असत्या आणि निसटल्या असत्या त्या सगळ्या तितक्याच सहजतेने चित्रपटात येतात.

आशयघन कथेला पडद्यावर तितक्याच उत्कटतेने रंगवण्यात चित्रपटातील तिन्ही वयातील कलाकार जोडय़ा यशस्वी ठरल्या आहेत. पण चेहऱ्यावरची निरागसता कायम ठेवूनही प्रेमातून येणाऱ्या मोठेपणाचा आव आणणारा हृदित्यचा छोटा अन्या मोठा हिरो ठरला आहे. तरुणपणीचा अन्या म्हणून अभिनय बेर्डेचा वावरही तितकाच सहज आहे. महाविद्यालयीन वयातील चॉकलेट हिरो म्हणून अभिनय फिट बसला आहे, त्याला तन्वीच्या भूमिकेत आर्या आंबेकरनेही उत्तम साथ दिली आहे. अंकुश चौधरी चित्रपटाचा मुख्य सूत्रधार आहे. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून अन्या म्हणून कधी पडद्यावर तर कधी सूत्रधार म्हणून केवळ आवाजातूनही अंकुशने आपली प्रेक्षकांवरची पकड कायम ठेवली आहे. तिन्ही अन्यांमधली सुसूत्रता सांभाळण्याची जबाबदारी अंकुशवर होती जी त्याने लीलया पेलली आहे. चित्रपटात बऱ्याच उशिराने येणारी तेजश्री प्रधानही मागून येऊन तन्वीच्या भूमिकेत भाव खाऊन जाते. तेजश्री आणि छोटेखानी भूमिकेत असलेल्या उर्मिला कानेटकर-कोठारी यांच्यातील भेटीचा प्रसंग या दोघींनी केवळ नजरेतून अस्सल रंगवला आहे. या दोघींबरोबरच संजय मोने, सुकन्या कुलकर्णी मोने, तुषार दळवी, अनुराधा राजाध्यक्ष यांनीही आपल्या भूमिका चोख केल्या आहेत.

गाणी हा प्रेमकथांचा खरा जीव. इथे तीन वेगवेगळ्या संगीतकारांकडून गाणी करून घेण्याचा प्रयत्नही यशस्वी ठरला आहे. विश्वजीतने संगीतबद्ध केलेले ‘हृदयात वाजे समिथग’ हे गाणे आधीच हिट झाले आहे. त्यातही ते विधित पाटणकर, आर्या आंबेकर आणि रोहित राऊत अशा तीन वेगवेगळ्या आवाजात चित्रपटभर गुंजत राहते. नीलेश मोहरीर याचे संगीत असलेले रोमॅंटिक ‘जरा जरा’ हे हृषीकेश रानडे आणि आर्याच्या आवाजातील गाणेही श्रवणीय आहे. ‘परिकथेतील परया’ या गाण्यालाही नीलेशने कौशिक देशपांडेचा आवाज खुबीने वापरला आहे. तर मंदार आपटेने संगीत दिलेले आणि गायलेले ‘कितीदा नव्याने’ हे गाणेही जमून आले आहे. कथा-संवाद, दिग्दर्शन, अभिनय, संगीत सगळ्याच पातळीवर सरस असलेली ‘ती सध्या काय करते’ ही सतीश राजवाडे यांनी टाकलेली गुलाबी प्रेमकथेची गुगली पडद्यावर पाहून कित्येक अन्यांची विकेट पडणार याची गॅरन्टी!

  • ती सध्या काय करते
  • निर्माता- झी स्टुडिओज, सतीश राजवाडे
  • दिग्दर्शन – सतीश राजवाडे
  • कलाकार – अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, हृदित्य राजवाडे, निर्मोही अग्निहोत्री, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी-मोने, तुषार दळवी, अनुराधा राजाध्यक्ष.