करोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांकडे मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला देशवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अगदी सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार सरकारला मदत करत आहेत. करोनाविरुद्ध पुकारल्या गेलेल्या या युद्धात आता ‘टिक-टॉक इंडिया’ देखील सामिल झाले आहे. त्यांनी तब्बल १०० कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीला देऊ केली आहे.

टिक-टॉक इंडिया कंपनी करोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी तब्बल ४० हजार हजमत मेडिकल प्रोटेक्टिव सूट आणि दोन लाक मास्कची मदत करणार आहे. अशा प्रकारे टिक-टॉक कंपनी १०० कोटी रुपयांची मदत करत आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली.

टिक-टॉक हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अॅप्लिकेशन्स पैकी एक आहे. देशातील जवळपास १० कोटींपेक्षा अधिक लोक टिक-टॉकचा वापर करतात. या अॅपवर अनेक लोक त्यांच्याकडे असलेलं टॅलेंट दाखवतात. काही जण गाणं गातात तर काही जण नृत्य सादर करतात. त्यामुळे अल्पावधीत हे अॅप इतकं लोकप्रिय झालं.