छोट्या पडद्यावरील अतिशय गाजलेल्या मालिकांपैकी एक असलेल्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधील अभिनेता अमन वर्माच्या आईचे निधन झाले आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे. अमनच्या आईचे १८ एप्रिल रोजी निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या.

अमनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने, ‘मला सर्वांना सांगताना अतिशय दु:ख होत आहे की माझी आई कैलास वर्मा यांचे निधन झाले आहे’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे.

अमनच्या या पोस्टवर इंडस्ट्रीमधील कलाकरांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. विंदू दारा सिंह, डेलनाज इराणी, जसवीर कौर, शिवानी गोसाई, श्वेता गुलाटी आणि इतर काही कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अमनने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘शांति’, ‘सीआईडी’, ‘क्योंकि सास भी कभी बहूं थी’, ‘कुमकुम’, ‘विरासत’, ‘सुजाता’ या त्याच्या मालिका हिट ठरल्या होत्या. त्याने ‘खुलजा सिम सिम’, ‘इंडियन आयडल’, ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स’ या शोचे सूत्रसंचालन केले होते. अमनने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ‘बागबान’, ‘अंदाज’, ‘कोई है’, ‘संघर्ष’, ‘जानी दुश्मन’, ‘लम्हा’, ‘देश द्रोही’, ‘तीस मार खां’, ‘दाल में कुछ काला है’ या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.