मालिका म्हटल्या की एकच एक घराचा सेट, तिथल्या तिथे एका चौकोनात घरातल्यांच्या मागे गोल फिरून एकाच अँगलवर सेट होणारा कॅमेरा या गोष्टी पूर्वापार चालत आल्या आहेत. कधी तरी मालिकेतलं कुटुंब फिरायला बाहेर पडायचं आणि मग त्यानिमित्ताने सेटच्या बाहेर पडलेला कॅमेरा टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांनाही फिरवून आणायचा. त्यांनाही थोडा मोकळा श्वास मिळायचा. नेहमीपेक्षा काही तरी वेगळं पाहिल्याचा हा आनंद नेहमी तेच पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही सुखावून जायचा. मात्र हा वेगळेपणा डेली सोपसाठी तसा महागडाच असल्याने क्वचितच चित्रीकरण बाहेर असायचे. आता कथेची गरज म्हणून का होईना स्टुडिओत ‘सेट’ झालेल्या घरांमधून मालिका बाहेर पडल्या असून सध्या कोकण, कोल्हापूर, सातारा ते हिंदीत तर थेट परदेशात मालिकांचे चित्रीकरण होऊ लागले आहे.

[jwplayer poPcqTHM]

colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

‘रात्रीस खेळ चाले’ ही ‘झी मराठी’वरची मालिका पूर्णपणे कोकणात सावंतवाडीत चित्रित झाली. त्यानंतर ‘काहे दिया परदेस’मध्येही कथेची आवश्यकता म्हणून काही भाग थेट वाराणसीत जाऊन चित्रित करण्यात आले. आता तर ‘तुझ्यात जीव रंगला’ची कथा कोल्हापूरात घडत असल्याने त्याचे चित्रीकरणही तिथेच केले जात आहे. ‘स्टार प्रवाह’वरच्या ‘नकुशी’ या मालिकेचे साताऱ्यात सलग चाळीस दिवस चित्रीकरण करण्यात आले. हिंदीत तर ‘परदेस में हैं मेरा दिल’ ही नवीन मालिका. नावाप्रमाणेच पूर्णपणे परदेशात चित्रित होते आहे. याआधी अनेक हिंदी मालिका परदेश भ्रमंती करून आल्या आहेत, पण परदेशातच चित्रित होणारी ही पहिली मालिका असेल. मालिकांचा रोजचा साचेबद्धपणा सोडून प्रेक्षकांना नवीन काही तरी देता यावे, या हेतूने स्टुडिओतल्या सेटला डच्चू देऊन वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रत्यक्ष लोकेशनवर चित्रीकरण करण्याकडे निर्माते-दिग्दर्शकांचा कल वाढतो आहे. वाहिन्यांनीही प्रेक्षकांची ही गरज ओळखून सढळ हस्ते खर्च करत या नवीन प्रयोगांना पाठिंबा दिला आहे.

आऊटडोअरला चित्रीकरण म्हणजे खर्च हा पहिला विचार डोक्यात येऊन निर्माते घाबरतात. बाहेरगावी चित्रीकरण म्हणजे अर्थातच तुमचे कष्ट वाढतात. स्टुडिओत राहून अख्खा दिवस चित्रीकरण केल्यानंतर तुम्हाला १५ ते२० मिनिटांचे फुटेज मिळते, तर बाहेरच्या ठिकाणी अवघ्या चार ते पाच मिनिटांचे फुटेज तुमच्या हातात येऊ शकते. मात्र ही भीती गेल्या काही मालिकांच्या निर्माते-दिग्दर्शकांनी खोटी करून दाखवली आहे, अशी माहिती ‘झी मराठी’चे व्यवसाय प्रमुख नीलेश मयेकर यांनी दिली. पण प्रेक्षकांना या मालिका बाहेर चित्रित केल्याने जो वेगळेपणा पाहायला मिळतो त्यावर ते खूश आहेत. त्याचा परिणाम मालिकांच्या टीआरपीवरही जाणवतो आहे. त्यामुळे कथेच्या निमित्ताने का होईना आऊटडोअर करण्यासाठी वाहिन्यांकडूनही विशेष प्रयत्न केले जात असल्याचे मयेकर यांनी सांगितले.

कथेची गरज यावर मालिकेचे चित्रिकरण आऊटडोअर असेल की इनडोअर असेल हे प्राधान्याने ठरते, असे मत ‘स्टार प्रवाह’वर नव्याने दाखल झालेल्या ‘नकुशी’ मालिकेचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर यांनी व्यक्त केले. स्टुडिओत सेट उभारून अनेक गोष्टी करता येतात, मात्र आता जे अत्याधुनिक कॅमेरे आले आहेत त्यात हा कृत्रिमपणा लगेच पकडला जातो. त्यामुळे ‘नकुशी’च्याच बाबतीत बोलायचं झालं तर नकुशीची प्रथा सातारा-कराड या भागात जास्त पाहायला मिळते. त्यामुळे तिथे मालिका चित्रित करताना एक तर तिथली संस्कृती, वातावरण, घराची रचना हे जसेच्या तसे कॅमेऱ्यात पकडता आले. आजूबाजूला वावरणारी माणसं जी तिथली खरी स्थानिक आहेत. हेच सेटवर चित्रित केलं तर या माणसांच्या पेहरावाचा, त्यांच्या देहबोलीचा अभ्यास करून आपल्याकडच्या कलाकारांना ते शिकवावं लागलं असतं. मात्र इथे आजूबाजूच्यांच्या दैनंदिन जीवनाला कोणत्याही प्रकारे धक्का न लावता आम्हाला तिथलं जसं आहे तसं वातावरण, तिथली लोकं दाखवता आली. त्यामुळे मालिका पाहिल्यानंतर ती बरी आहे का, या प्रश्नाला ती ‘खरी’ वाटते आहे अशी पसंतीची पावती प्रेक्षकांकडून मिळाल्याचे चिंचाळकर यांनी सांगितले.

हिंदी चित्रपटांसाठी देशविदेशात चित्रीकरण करणाऱ्या दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनीही कथेनुरूप अस्सल वातावरण दाखवणं ही गरज असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांच्या ‘युद्ध के बंदी’ या ‘स्टार प्लस’ वाहिनीवरच्या नव्या मालिकेची कथा कारगिलच्या पाश्र्वभूमीवर असल्याने कथानकाचा महत्त्वाचा भाग त्या परिसरात चित्रित केला असल्याचे अडवाणी यांनी सांगितले. अर्थात आऊटडोअर करताना आर्थिक अडचणी येणारच हेही उघड असते, असे मयेकर म्हणतात. एखाद्या वेगळ्या शहरात चित्रीकरण करणे ही सुखाची नोकरी नव्हे पण आज ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका पाहून जेव्हा लोक शेती, गावातली घरं, उसाचं शेत पाहून आनंद झाल्याचे आवर्जून कळवतात तेव्हा हे कष्ट महत्त्वाचे ठरतात. शिवाय, तिथला तरुण वर्ग मालिकेशी जोडला जातो. स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण होतो, हेही फायदे दुर्लक्ष करता येणारे नाहीत, असे मयेकर यांनी स्पष्ट केले. ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सावंतवाडीतल्या ज्या आकेरी गावात चित्रित झाली ते गाव पाहण्यासाठी पर्यटक तिथे येऊ लागले होते. स्थानिकांना मालिकेत काम करण्याची संधी मिळालीच शिवाय या पर्यटकांमुळे चहाच्या टपरीपासून खाद्यपदार्थाच्या दुकानांमध्येही वाढ झाली होती, असे मालिकेचे निर्माते सुनील भोसले यांनी सांगितले. पण आऊटडोअर चित्रीकरण करायचे तर निर्मात्यांचा आणि वाहिनीचाही पाठिंबा हवा. तरच अशा प्रकारची मालिका निर्मिती शक्य होऊ शकते, असे वैभव चिंचाळकर यांनी स्पष्ट केले. तर मालिका आऊटडोअर चित्रित करायची तर निर्माते- दिग्दर्शकाचीही इच्छा हवी. नव्याने काही करू पाहणारे आजचे निर्माते-दिग्दर्शक अशा प्रकारे बाहेरगावी चित्रीकरण करण्याकडे आव्हान म्हणून पाहतात. त्यामुळे त्यांनी मर्यादित खर्चातही नवीन शहरात चांगले चित्रीकरण होऊ शकते हे आपल्या मालिकांमधून दाखवून दिले आहे, असे नीलेश मयेकर यांनी स्पष्ट केले. हिंदीत बाहेरगावी चित्रीकरण करण्याचे गणित फार अवघड नाही, पण मराठी मालिकाही लवकरच परदेशात चित्रित झालेल्या पाहायला मिळतील, असा विश्वास मालिका निर्मात्यांनी व्यक्त केला.

[jwplayer psUg1N0g]