विश्वचषक स्पर्धा २०१९च्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने सुपर ओव्हरच्या माध्यमातून विजय मिळविला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. इंग्लंडच्या विजयानंतर सर्व स्तरांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामध्येच अभिनेता शाहिद कपूरनेही त्याचं मत व्यक्त केलं आहे. हा विश्वचषक दोन्ही संघांमध्ये विभागून द्यायला हवा होता, असं शाहिद म्हणाला आहे.

शाहिदने ट्विटरच्या माध्यमातून त्याचं मत मांडलं आहे. “२०१९ चा विश्वचषक दोन्ही संघांमध्ये विभागून द्यायला हवा होता. या सामन्यामध्ये इंग्लंडने जास्त चौकार मारले, तर न्यूझीलंडने जास्त गडी बाद केले. या सामन्यामधील २२ खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली,सारं पणाला लावलं. मग केवळ अकराच जणांना ते उत्तम खेळले असं का भासवून देत आहात?”, असं ट्विट शाहिदने केलं आहे.

दरम्यान, उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर अनेकांनी टीका केली होती तर काहींनी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळीचं कौतुक केलं होतं. दरम्यान सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला आहे.