सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध झालेल्या रानू मंडल कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. आपल्या गायनकौशल्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलेल्या रानू यांना संगीतकार-गायक हिमेश रेशमियाँने चित्रपटात पार्श्वगायन करण्याची संधी दिली. ‘हॅपी हार्डी अँड हीर’ या त्याच्या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केलं. सध्या त्या सोशल मीडियावर गायनामुळे नाही तर त्यांच्या एका लूकमुळे चर्चेत आहेत. एका कार्यक्रमासाठी त्यांचा मेकअप करण्यात आला. पण हा मेकअप अत्यंत भडक रंगाचा करण्यात आल्याने रानू मंडल ट्रोलच्या शिकार झाल्या आहेत.

रानू मंडल यांचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली. बरेच उपहासात्मक मीम्ससुद्धा व्हायरल झाले. या मीम्स व टीकाटिप्पणींच्या गर्दीत ट्विटरवर काही जणांनी रानू यांची बाजू घेतली. “रानू यांनी स्वत:हून हे सगळं केलं नाही. त्यांची खिल्ली उडवणं चुकीचं आहे”, असं म्हणत ट्विटरकरांनी रानू मंडल यांना साथ दिली. तर काहींनी ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

अनेकांनी रानू यांच्या मेकअप आर्टिस्टवर टीका केली. भडक मेकअप करून तू त्यांचं नैसर्गिक सौंदर्य झाकून टाकलंस, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली.

काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक महिला चाहतीने रानू मंडल यांच्या हाताता स्पर्श करत सेल्फीसाठी विनंती केली होती. त्या महिलेने हाताला स्पर्श करणे रानू यांना आवडले नाही. ‘असा हाताला स्पर्श करुन आवाज का देता? काय आहे हे?’ असे म्हणत रानू यांनी त्या महिलेला सुनावले होते. रानू यांचे वेगळे वागणे पाहून महिला त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. ज्या नेटकऱ्यांनी रानू यांना रातोरात स्टार केले त्याच नेटकऱ्यांनी रानू यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीसाठी फटकारले होते.