हिंदी चित्रपटसृष्टीत किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान त्याच्या वेगळ्याच अंदाजात व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करत आहे. १३ फेब्रुवारीच्या रात्री म्हणजेच १४ फेब्रुवारीची सुरुवात होताच जुहू बीचवर मध्यरात्रीनंतर शाहरुखने लेट नाइट वॉकने या खास दिवसाची सुरुवात केली असे म्हणायला हरकत नाही. शाहरुखने त्याच्या मुलासह म्हणजेच लाडक्या अब्रामसह नाइट वॉकला जात त्याच्यासोबत काही क्षण व्यतीत केले.

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे एक फोटो ट्विट करत लिहिले आहे की, ‘हातात हात घेऊन जुहू बीचवर आम्ही मारलेला फेरफटका आणि आम्ही बनविलेला कॅस्टल आयुष्यभरासाठी तसाच रहावा..’. या ट्विटसोबतच शाहरुखने त्याच्या चाहत्यांसाठी एक संदेशही लिहिला आहे. किंग खान त्याच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही ही बाबही तितकीच खरी आहे. त्यामुळे व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी चाहत्यांसाठी हा सुरेख अभिनेता कोणती खास ट्रीट घेऊन येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तुर्तास तो अब्रामसोबतच हा प्रेमाचा दिवस साजरा करण्याच्या बेतात दिसत आहे असेच म्हणावे लागेल.

शाहरुख आणि अब्रामचे नाते काहीसे खास आहे. चित्रिकरणापासून ते अगदी मुलाखतीपर्यंत सर्वच ठिकाणी चिमुरडा अब्राम शाहरुखसोबतच जातो. इतकेच नव्हे तर प्रसारमाध्यमांना कोणत्या प्रकारे सामोरे जायचे हे सुद्धा अब्रामला इतक्यातच उमगले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रईस’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख लवकरच इम्तियाज अली दिग्दर्शित ‘रहनुमा’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक यशस्वी अभिनेता बनण्याचे स्वप्न शाहरुखने पूर्ण केले असले तरी या बॉलिवूड बादशहाचे आणखी एक स्वप्न आहे, ज्याचा उलगडा त्याने नुकताच एका मुलाखतीमध्ये केला.

शाहरुख स्वत:चे रेस्तरॉ उघडण्याचे स्वप्न मनी बाळगून आहे. आता तुम्ही म्हणाल हे स्वप्न तर त्याच्यासाठी सहज शक्य होणारे असेच आहे. पण शाहरुखचे स्वप्न रेस्तोरॉ सुरु केल्यानंतर सुरु होणारे असल्याचे दिसते. इटालियन पद्धतीच्या खाद्यपदार्थांची मेजवाणी असणाऱ्या या रेस्तरॉमध्ये शाहरुखला खुद्द शेफ बनून लोकांना भरविण्याची इच्छा आहे. शाहरुखने स्वत:ची तुलना बॉक्सर जॅक लामोटाशी (Jake LaMotta ) करत त्याच्यासारखे शेफ बनण्याची स्वप्न पाहत असल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले. लठ्ठ झाल्यानंतर जुहू परिसरात रेस्तरॉ उघडून लोकांना इटालियन मेजवानी देईन, असे तो म्हणाला.