देव यांच्या मुलाखतीचे ‘डॉक्युमेंटेशन’ होणार; नवोदित गायकांना संगीताचे धडे देणार
जुन्या पिढीतील ज्येष्ठ कलाकार, गायक, संगीतकार यांच्या मुलाखतींचे ध्वनिचित्रमुद्रण करून त्याचे दस्तावेजीकरण करण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन रविवार, १२ जून रोजी करण्यात आले आहे.
एका संगीत कार्यशाळेच्या निमित्ताने होणाऱ्या या मुलाखतीचे ध्वनिचित्रमुद्रण केले जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला होता. डॉ. अजय वैद्य यांनी त्यांना बोलते केले होते.
९१ वर्षीय देव यांच्या मुलाखतीमधून त्यांचा सांगीतिक प्रवास उलगडला जाणार आहे. मराठी भावसंगीत ते चित्रपट संगीतापर्यंतच्या विविध आठवणी, किस्से, देव ज्याचा पुरस्कार करतात ती शब्दप्रधान गायकी, संगीतातील त्याचे महत्त्व, देव यांनी संगीतबद्ध केलेली विविध गाणी, त्यांची निर्मिती यांची माहिती दस्तुरखुद्द देव यांच्याच तोंडून प्रात्यक्षिकासह रसिकांना ऐकता येणार आहे.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिराच्या प्रांगणात असलेल्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी ९ ते १२ या वेळेत ही कार्यशाळा व मुलाखतीचे ध्वनिचित्रमुद्रण होणार आहे. मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांना विनामूल्य प्रवेश आहे.
‘स्वरदा कम्युनिकेशन्स अ‍ॅण्ड इव्हेंट्स’ व ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या पिढीतील गायकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेसाठी निवड करण्यात आलेल्या निवडक तरुण गायक-गायिका यांना यशवंत देव मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांची मुलाखत होणार असून ती ‘डॉक्युमेंटेशन’ स्वरूपात जतन केली जाणार आहे.