अभिनेते आणि अभिनेत्रींना पाहण्याची त्यांच्यासोबत फोटो काढण्याची क्रेझ आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. रसिकांकडून मिळणारी ही पसंती काहीशी सुखावणारी असली तरीही या गर्दीला पाहून काहीवेळा हे सेलिब्रिटीही घाबरुन जातात. छोट्या पडद्यावरील प्रसिद्धी अभिनेचीही नुकतीच अशी अवस्था झालेली पाहायला मिळाली. तिचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी किंवा तिला शेकहॅंड करण्यासाठी तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला असता ती अक्षरश: घाबरुन गेल्याचे दिसत आहे. चाहत्यांनी तिला पार घेरले आणि यातून बाहेर कसे पडायचे असा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला.

मग तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ईशा गुप्ता हिने तिला या गर्दीतून मार्ग काढण्यास मदत केल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. मग गाडीजवळ आल्यावर तिच्या एका मित्राने तिला चाहत्यांमधून बाजूला काढण्यास मदत केली. सुरक्षारक्षक नसल्याने मौनीची ही अवस्था झाल्याचे पहायला मिळाले. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असूनही बॉलिवूडच्या तारकांप्रमाणे गर्दी खेचणाऱ्या मौनीची प्रसिद्धी यानिमित्ताने समोर आली. मौनीचा स्टाईलिश अंदाज, तिची फॅशनची समज आणि तिचा अभिनय सगळेच हटके असल्याने चाहत्यांमध्ये तिची क्रेझ वाढते आहे. तसेच गोल्ड या नुकत्याच आलेल्या चित्रपटामुळे तिची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे. अक्षयकुमारच्या पत्नीची भूमिका तिने अतिशय उत्तम साकारल्याने चाहते तिच्यावर खुश आहेत. गोल्डमधून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले असले तरीही त्याआधी तिने ४ चित्रपट साईन केले आहेत.