विज्ञान आणि धर्म या दोन गोष्टी एकमेकांविरोधात उभे राहण्याऐवजी एकत्र असू शकतात असं मत अभिनेत्री विद्या बालनने मांडलं. विद्याची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये ती ISROच्या वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. मी स्वत:ला धार्मिक दाखवणं टाळते, असंही विद्या या मुलाखतीत म्हणाली.

”सध्या धर्माचा अर्थ ज्याप्रकारे लावला जातो त्यातच समस्या असल्याचं मला वाटतं. असे अनेकजण आहेत जे स्वत:ला धार्मिक असल्याचं दाखवणं टाळतात आणि मीसुद्धा त्यातीलच एक आहे. मी धार्मिक आहे असं नाही म्हणायला पाहिजे असं मला अनेकदा वाटतं आणि म्हणूनच मी स्वत:ला अध्यात्मिक म्हणते,” असं विद्याने ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

आणखी वाचा : ‘मिशन मंगल’च्या यशानंतर जॉनने दिल्या शुभेच्छा, अक्षयच्या रिप्लायने जिंकली चाहत्यांची मनं 

”धार्मिक असणे म्हणजे असहिष्णू असणे असा सामान्य अर्थ काढला जात असल्याने धार्मिक या शब्दालाच एक नकारात्मक प्रतिमा मिळाली आहे. प्रत्येक ठिकाणी तुझ्या विरुद्ध मी अशीच चर्चा पाहायला मिळते. त्यामुळे ‘आम्ही’ ही संकल्पनाच शिथिल होत चालली आहे,” असं ती म्हणते.

विज्ञानाच्या पलीकडे असणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या तारा शिंदेची भूमिका विद्याने चित्रपटात साकारली आहे. ”आपण किती मुक्त विचारांचे आहोत हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. सध्याच्या जगात, स्वातंत्र्य म्हणजे मला स्वतंत्र व्हायचं आहे पण तुला नियंत्रणात ठेवून असा अर्थ झाला आहे. एखाद्याला नियंत्रणात ठेवून तुम्ही स्वतंत्र होऊ शकत नाही,” असं मत विद्याने मांडलं.