‘मोरूची मावशी’ या नाटकातील ‘मावशी’ अजरामर करणारे, रंगभूमीसोबतच सिनेमा आणि टीव्ही मालिकांमधून रसिकांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांचे शुक्रवारी सकाळी दिर्घ आजाराने निधन झाले. विजय चव्हाण यांनी ४० वर्षे अभिनयासाठी समर्पीत केली. त्यांनी ४०० चित्रपटांमध्ये दर्जेदार काम केले आहे.

पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टुरटुर’ नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणारे विजय चव्हाण यांचा प्रवास थक्क करणारा आहे. शाळेत शिकत असताना नाटकातील मुख्य कलाकार अचानक गैरहजर असल्यामुळे विजय चव्हाण यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी अभिनयाला आपले आयुष्य समपर्पीत केले.

आणखी वाचा  – चांगला मित्र गेला याचं दु:ख अधिक – अशोक सराफ

विजय चव्हाण यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकातून आपल्या अभिनयाची ताकद मराठी सिने-नाट्यसृष्टीत दाखवून दिली. हे नाटक त्यांच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलं. त्यानंतर श्रीमंत दामोदरपंत या नाटकातही त्यांनी धम्माल उडवून दिली. १५ व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. तब्बल दीडशे सिनेमांमधून विजय यांनी मोठ्या पडद्यावर झळकले आणि लक्षातही राहिले. मराठी सिने-नाट्यसृष्टीतील विनोदाची परंपरा पुढे नेण्यात विजय चव्हाण यांचं मोलाचं योगदान आहे. अगदी दादा कोंडकेंपासून ते आताच्या पिढीतील भरत जाधवपर्यंत अनेक कलाकारांसोबत त्यांनी अगदी सहजतेनं काम केलं. विनोदी अभिनेता म्हणून त्यांना अवघे मराठी रसिक ओळखतातच, मात्र त्याचसोबत त्यांच्या गंभीर भूमिकाही गाजल्या. विनोदाचं उत्तम टायमिंग विजय चव्हाण यांना होतं. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

मालिका –
असे पाहुणे येती, माहेरची साडी, येऊ का घरात, रानफूल, लाइफ मेंबर.

नाटके
कशात काय लफड्यात पाय, कशी मी राहू तशीच, कार्टी प्रेमात पडली, खोली नं. ५, झिलग्यांची खोली, जाऊ बाई हळू, टुरटूर, देखणी बायको दुसऱ्याची, बाबांची गर्लफ्रेंड, मोरूची मावशी, हयवदन, श्रीमंत दामोदरपंत.

काही गाजलेले चित्रपट – वहिनीचा माया, घोळात घोळ, धुमाकूळ, शेम टू शेम, माहेरची साडी, बलिदान, शुभमंगल सावधान, एक होता विदूषक, माझा छकुला, चिकट नवरा, धांगडधिंगा, पछाडलेला, अगंबाई अरेच्चा, जत्रा, चष्मे बहाद्दर, इश्श्य, जबरदस्त बकुळा, नामदेव घोटाळे, वन रुम किचन, श्रीमंत दामोदर पंत , झपाटलेला.

आणखी वाचा – अभिनेते विजय चव्हाण यांचं शुक्रवारी  दीर्घ आजाराने निधन