आगमी लोकसभा निवडणुकांच्या काळात बहुप्रतिक्षित असा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी सर्वाधिक उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास या बायोपिक दाखवण्यात आला आहे. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मोदींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. ओमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. एक सामान्य चहा विक्रेता ते सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचा पंतप्रधान असा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या प्रवासात मार्गात येणाऱ्या अडचणी, निर्माण होणारे वाद विवादांचे चक्रव्यूह आणि त्यातूनही मार्ग काढत आपलं कर्तव्य निभावणारे मोदी अशा अनेक घटना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. विवेक ओबेरॉयसह बोमन इराणी, इरीना बहाव, बरखा बिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायणन यांसारखे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

ट्रेलर लाँच झाल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट २३ भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. मोदींचा बायोपिक १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनावर गोव्यातील काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेनं आक्षेप घेतला होता. निवडणुकांच्या काळात मतदारांना अधिक आकर्षित करून भाजप स्वत:चा फायदा करून घेत आहेत असा आरोप क्राँगेसचा होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी असं पत्र निवडणूक आयोगाला लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती.