सुहास जोशी

खरं तर हा एकदम हॉट विषय, काहीही दाखवा ते पाहिलं जाणार. अर्थात इथेदेखील पाहिले जाणे ही कसोटी लावली तर त्यामध्ये यशस्वी ठरू शकतात, काही प्रमाणात तसे झाले देखील. पण आधीच्या सीझननंतर उंचावलेल्या अपेक्षांना न्याय मिळाला असे यातून घडत नाही. ‘इनसाइड एज’ या बहुचर्चित अशा वेबसीरिजचा दुसरा सीझन गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झाला. अपेक्षित असा मालमसाला या सीझनमध्येही ठासून भरला आहे, मात्र एक कलाकृती म्हणून त्यात काही वेगळेपण आहे असे दिसत नाही.

मुंबई माव्‍‌र्हीक संघाचा पुढील ‘पीपीएल सीझन’मधील प्रवास, संघ मालकांमधील बदल, ‘हरयाणा हरिकेन’ संघाची नवी चाल आणि या सर्वातून आधीच बरबटलेल्या ‘पीपीएल’ची आणखीनच विदारक अशी स्थिती यावर यामध्ये भर आहे. ‘मुंबई माव्‍‌र्हीक’मधून बाहेर पडलेल्या कप्तान अरविंद वसिष्ठला ‘हरियाणा हरिकेन’चा मालक हंडा शोधून काढतो आणि त्याच्या संघाचा कप्तान करतो. तर वायू राघवन ‘मुंबई माव्‍‌र्हीक’चा कप्तान होतो. वायूचा तापटपणा कायम असतो. त्यामुळे संघ निवडीपासून प्रत्येक टप्प्यावर संघ मालकांशी त्याचे खटके उडतात. दुसरीकडे माव्‍‌र्हीकच्या भागीदारीत भाईसाहेब म्हणजेच भारतीय क्रिकेटचे अध्यक्ष यशवर्धन पाटील यांच्या मुलीचा मालकी टक्का वाढल्याने महत्त्वाचा बदल झालेला असतो. तर अरविंद हरिके नसाठी एकाच खेळाडूवर आठ कोटी खर्च करण्यास हंडाला भाग पाडतो. परिणामी इतर खेळाडूंसाठी पैसे कमी पडतात. मागच्या सीझनच्या अखेरीस गायब झालेला विक्रांत धवन बंगलोर टीमकडून सक्रिय होतो. दुसरीकडे केंद्रीय पातळीवरील राजकारणामुळे ‘पीपीएल’ला भारतात परवानगी मिळत नाही. तेव्हा दक्षिण आफ्रिकेत सामने भरवले जातात. स्पॉट फिक्सिंगचे नवीन प्रयोग, उत्तेजकांचे सेवन, सामनाबाह्य़ घडामोडी हे सर्व सुरू होते. एकमेकांत अडकलेले आणि कुरघोडी करणारे राजकारण सर्व पट व्यापून टाकते. त्यातून क्रिकेट किती उरते हा प्रश्न शिल्लक राहतो.

‘आयपीएल’च्या सामन्यातून क्रिकेटमध्ये झालेल्या या विचित्र बदलाला छोटय़ा पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न असेच या दोन्ही सीझनचे प्राथमिक स्वरूप आहे. त्यामुळे आजवर उघडकीस आलेल्या घटनांना क्रीएटिव्ह फोडणी देणे हेच महत्त्वाचे काम आहे. त्यामध्ये सीरिजकर्ते माफक प्रमाणात यशस्वी ठरतात. मुळातच मसाला ठासून भरलेला असल्याने त्याचीच महत्त्वाची जोड मिळते. पण त्यात सीरिजकर्त्यांनी स्वत:हून काही भरीव कथानक दिलेले नाही. कथा कशी सांगितली जाते यावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात. ‘इनसाइड एज’मध्ये कथा अगदी एका सरळ रेषेत सांगितली जाते. त्यामध्ये नाटय़निर्मितीसाठी काही विशेष प्रयत्न होत नाहीत. किंबहुना तसे काही प्रयत्न करण्यात आले आहेत असे देखील सीरिज पाहताना कुठेही जाणवत नाही.

काही वेगळे प्रसंग घेऊन ते रंगवण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे, पण अनेकदा ते बालिश वाटतात. मूळ कथानकाला ही जोड असली तरी ती बेमालूमपणे मिळसून न जाता तिचे उपरेपण जाणवत राहते. विशेषत: दोन क्रिकेटपटूंना झालेला एक दिवसाचा तुरुंगवास. यातून ओढूनताणून काही तरी भाष्य करण्याचा प्रयत्न दिसून येतो. वायूच्या जुन्या प्रशिक्षकाच्या माध्यमातूनही असेच काही तरी उथळ मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

सामना फिक्सिंग हा मूळ भाग असल्यामुळे तो प्रभावी मांडणे यासाठी केलेले चित्रीकरण, त्यासाठी वापरलेल्या क्लृप्त्या प्रभावी आहेत. अगदी लाईव्ह सामना पाहण्याचा अनुभव त्यातून मिळतो. त्याचबरोबर पात्रांची निवड ही आणखीन एक भक्कम बाजू आहे. या दोहोंमुळे प्रेक्षकांना सीरिजमध्ये गुंतवून ठेवण्यात यश मिळते. या दोन्हीसाठी के लेले प्रयत्न हे सीरिज पाहण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

मूळ प्रकरणात खच्चून नाटय़ भरले असल्याने तो पडद्यावर मांडताना त्यापेक्षा वेगळे काय करायचे हा प्रश्न असू शकतो. तसा तो येथेदेखील आहेच. पण अशावेळीच खरा कस लागतो. ‘इनसाइड एज’चा पहिला सीझन आला तेव्हा त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यातून अपेक्षा प्रचंड उंचावल्या, पण त्यानंतर तब्बल दोन वर्षांंनी दुसरा सीझन आला. सध्याच्या काळात इतकी दीर्घ प्रतीक्षा ही आव्हानात्मक आणि धोकादायक ठरू शकते. अशावेळी या दुसऱ्या सीझनकडून काही तरी ठोस प्रभाव अपेक्षित होता, मात्र त्याचा अभाव स्पष्टपणे दिसतो. अशाच प्रकारे मालिका सादर करायची असेल तर असे अनेक सीझन करता येतील.

 

इनसाइड एज

सीझन – दुसरा

ऑनलाइन अ‍ॅप – अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ