तरुणपणाच्या उंबरठय़ावर समकालीन विषयांची बांधणी करत अनेकदा समाजातील कटू-गोड सत्य वास्तव रूपात सादर करत प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकविणाऱ्या दर्जेदार एकांकिकांचे जाळे आता व्यावसायिकतेच्या दारीही घुमू लागले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये थेट मनाला भिडणाऱ्या एकांकिकांचे विषयच नव्हे तर अगदी संपूर्ण एकांकिकाच व्यावसायिक रंगमंचावर उतरली आहे. प्रयोगशीलता जपताना नावीन्य आणण्याच्या प्रयत्नाबरोबर अफाट निरीक्षणशक्ती असलेले लेखकही तरुण पिढीत तयार होत आहेत. ‘आयएनटी’, ‘सवाई’, ‘युथ फेस्ट’, ‘उत्तुंग’, ‘पुरुषोत्तम करंडक’ आणि ‘लोकसत्ता लोकांकिका’ यांसारख्या स्पर्धा नाटय़क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. या व्यासपीठावर आपल्या नाटय़कलेच्या माध्यमातून सध्या भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याचे काम तरुणाई एकांकिकांमधून करत आहे. त्यांच्या या सर्जनशीलतेची दखल नाटय़क्षेत्रातील कलावंतांनीही घेतली असून अशा स्पर्धाना हजेरी लावत चांगल्या एकांकिकांना आपल्या निर्मितीसंस्थांचे बॅनर देत व्यावसायिक रंगमंचावर आणण्याचे कामही सध्या जोमाने सुरू आहे. त्याचा फायदा ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या दोन एकांकिकांना झाला असून लवकरच त्या व्यावसायिक रंगभूमीवर येणार आहेत.

यंदाच्या ‘लोकसत्ता लोकांकिको’ स्पर्धेत मुंबई विभागीय अंतिम फे रीत द्वितीय आणि तृतीय पारितोषिक पटकावणाऱ्या अनुक्रमे ‘श्यामची आई’ आणि ‘ओवी’ या एकांकिका लवकरच व्यावसायिक रंगभूमीवर पाहायला मिळणार आहेत. याबरोबरच मागील वर्षी हिट ठरेलली ‘सेल्फी’ आणि यंदाच्या वर्षी लिव्ह इन रिलेशनशिीपसारखा बोल्ड विषय घेऊन आलेली ‘लास्ट ट्राय’ या दोन्ही एकांकिकांचे मिळून एका व्यावसायिक नाटकाचा प्रयोग गेल्याच महिन्यांत सादर करण्यात आला आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
A new storyline series for the audience on the occasion of Gudi Padwa 2024
गुढी नव्या मालिकांची
hotel owner attempts suicide in front of police station
हॉटेल व्यावसायिकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न; काय आहे प्रकार?

स्वप्निल जाधव लिखित ‘श्यामची आई’ ही एकांकिका येत्या दोन महिन्यांत व्यावसायिक रंगमंचावर झळकणार आहे. या वर्षी अनेक स्पर्धामध्ये यश मिळवल्यानंतर ‘सुयोग’ या निर्मिती संस्थेने स्वप्निलला व्यावसायिक नाटक करण्याबाबत विचारणा केली. ‘श्यामची आई’ या एकांकिकेतील विषय आणि यात दाखविलेल्या आईचे रूप हे सर्वसाधारण आईच्या प्रतिमेला छेद देणारे आहे. या एकांकिकेचे व्यावसायिक नाटक करताना काही प्रसंग सविस्तर देण्यात आले असल्याचे स्वप्निलने सांगितले. एकांकिका करताना वेळेअभावी प्रत्येक प्रसंगाला न्याय देणे शक्य झाले नव्हते, मात्र नाटकात पात्रांच्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला आहे. व्यावसायिकतेच्या दृष्टीने नेपथ्य आणि कलाकारांमध्ये बदल करण्यात आला आहे. मराठी रंगभूमीवर चांगल्या एकांकिकांना फक्त शाबासकी देऊन सोडले जात नाही तर त्यांच्यातील प्रयोगात्मक मूल्य व्यावसायिक पातळीवर आणले जाते. मराठीबरोबरच ‘श्यामची आई’ गुजरातीमध्येही रूपांतरित होणार आहे, असे स्वप्निलने सांगितले.

‘लास्ट ट्राय’ आणि ‘सेल्फी’ या दोन्ही एकांकिकातील पात्रांचे स्वभाव समांतर पातळीवर असल्याचे लक्षात आल्यावर एकांकिकेची लेखिका स्वरदा बुरसे आणि दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी एकांकिका व्यावसायिक करण्याचे ठरवले. ‘सेल्फी’ या एकांकिकेचा प्रयोग सुरू असताना अभिनेते गिरीश ओक यांनी ही एकांकिका नाटक स्वरूपाच लिहिण्याबाबत विचारले होते. तेव्हा ‘सेल्फी’च्या विषयात मर्यादा असल्यामुळे मला त्याचे दोन अंकी नाटक लिहिणे शक्य झाले नसल्याचे स्वरदा हिने सांगितले. मात्र या वर्षी आलेली ‘लास्ट ट्राय’ या एकांकिकेतील मुख. नायिकेची व्यक्तिरेखा, तिचा स्वभाव हा ‘सेल्फी’च्या आशयाशी जुळत असल्याचे लक्षात आल्यावर आम्ही दोन्ही एकांकिका एकत्र करण्याचे ठरवले. संहितेत काही बदल केल्यानंतर कल्याणला प्रायोगिक नाटक म्हणून ‘सेल्फी’चा पहिला प्रयोग सादर करण्यात आला. व्यावसायिकतेची समीकरणे वेगळी असल्यामुळे येथे आíथक पाठबळ पुरविण्यासाठी निर्मात्यांची गरज असते, असे या नाटकाचा दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव याने सांगितले. नाटकात मनोरंजनाचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे त्यानुसार नाटकाच्या नेपथ्यापासून, संवाद आणि कलाकारांमध्येही बदल करावे लागतात. सेल्फी या नाटकातून सध्याच्या तरुण पिढीचे वास्तव दíशत केले आहे. विषय, संवाद, प्रसंग यामध्ये बोल्डपणा असला तरी हे सध्याचे वास्तव असल्याची भावना अभिजीत याने व्यक्त केली.

‘हाऊसफुल’, ‘गिरगाव व्हाया दादर’, ‘हिस्ट्री ऑफ लिजन’ या एकांकिका व्यावसायिक नाटकांच्या रंगमंचावर आणताना लेखक हृषीकेश कोळी याने नाटकाचा आकृतिबंध समोर ठेवून त्यानुसार बदल केले. एकांकिकेला खूप गती असते आणि हा प्रेक्षक ते उत्स्फूर्तपणे स्वीकारतो. मात्र नाटकाच्या प्रेक्षकाला मनोरंजन, तंत्रज्ञान यात अधिक ओढ असते. एकांकिकेतून अनेक चांगले विषय मिळतील, मात्र सर्वच टिकतील यांची शाश्वती नाही. एकांकिकेचे नाटक करताना वेगवेगळ्या अंगांनी त्यांचा अभ्यास करण्यात आला. एकांकिकेचे नाटकात संक्रमण करताना अनेकदा मूळ विषय निसटत चालल्याची भावनाही येते, माझ्यासारख्या एकांकिकेतून उभ्या राहिलेल्या अनेक लेखकांना असे नक्कीच वाटले असेल. मात्र अभ्यास, अभिनय आणि कलाकारांची जोड देत नाटक उभं राहतं, असे हृषीकेश म्हणाला. आपली चाळीस मिनिटांची एकांकिका व्यावसायिकतेच्या दोन ते अडीच तासांच्या साच्यात बसविणे शक्य होईल का?, ही भीती प्रत्येक लेखक-दिग्दर्शकापुढे उभी असते. मात्र एकांकिकांचा विषय आणि सादरीकरणाच्या जोरावर एकांकिकांनी व्यावसायिकतेचा उंबरठा केव्हाच ओलांडला आहे आणि बऱ्याच एकांकिका व्यावसायिक रंगभूमीवर आपला झेंडा फडकवत ताकदीने उभ्या आहेत.