अंकुश-मुक्ताच्या ‘डबल सीट’वर रसिकांची मोहोर

‘झी टॉकीज’च्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ पुरस्कार सोहळ्याची चर्चा दरवर्षी रंगते. लघुसंदेशांद्वारे रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि मते मागवून त्यानुसार मराठी चित्रपटांमधून सर्वाधिक मते मिळालेल्या चित्रपटावर रसिकांच्या ‘फेव्हरेट’ची मोहोर उमटविली जाते. यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकपसंतीची मोहोर ‘डबल सीट’ चित्रपटावर उमटली असून साहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी सई ताम्हणकर, साहाय्यक अभिनेता पुरस्कारासाठी वैभव मांगले, तर ‘फेव्हरेट’ बालकलाकार म्हणून ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील मुक्ता ही भूमिका साकारणारी सायली भांडारकवठेकर हिला प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळाली आहे. या सोहळ्याचे प्रक्षेपण २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज वाहिनीवरून केले जाणार आहे.
विविध विभागांमध्ये यंदा क्षितिज पटवर्धन लिखित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित ‘डबल सीट’ या मुक्ता बर्वे-अंकुश चौधरी जोडीच्या चित्रपटाने यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ पुरस्कारांमध्ये बाजी मारली. रसिकांनी नोंदवलेल्या सर्वाधिक मतांनुसार ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाने फेव्हरेट चित्रपटाचा मान पटकाविला, तर फेव्हरेट दिग्दर्शक म्हणून ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘डबल सीट’मधील ‘किती सांगायचंय मला’ या गाण्यासाठी जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांना गौरविण्यात आले. फेव्हरेट नवोदित कलाकार म्हणून ‘देऊळबंद’ चित्रपटातील भूमिकेसाठी गश्मीर महाजनी, तर फेव्हरेट स्टाईल आयकॉन म्हणून अंकुश चौधरीला पुरस्कार देण्यात आला. ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ पुरस्कार अभिनेत्री प्रिया बापटने पटकाविला.
या सोहळ्यात नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाऊण्डेशन’ला झी टॉकीजच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. नाना पाटेकरने या सोहळ्यात एक अनोखे सादरीकरणही केले. विविध गाणी, नृत्याविष्कार आणि विनोदी स्कीट्समुळे रंगलेल्या या सोहळ्यात भालचंद्र कदम, सिद्धार्थ जाधव, पंढरीनाथ कांबळे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण, हेमांगी कवी, श्रेया बुगडे आदींनी सहभाग घेतला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन वैभव तत्त्ववादी आणि सिद्धार्थ चांदेकर या कलावंतांनी केले.