छोटय़ा पडद्यावर काम करताना मोठय़ा पडद्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. मात्र, त्यासाठी कलावंतांनी आपण त्यासाठी सक्षम आहो की नाही याचा विचार केला पाहिजे. मोठय़ा पडद्यावर संधी मिळाली की काम करणार आहे. मात्र, सध्या मालिकांवर लक्ष केंद्रित करीत असल्याचे मत अभिनेते रवी दुबे यांनी व्यक्त केले.
झी टीव्हीवरील जमाई राजा या मालिकेच्या प्रमोशनसाठी रवी दुबे नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. जमाई राजा या मालिकेत जावयाची भूमिका करीत असताना दोन संसार सांभाळ्याचे काम करावे लागणार आहे. पत्नी आणि सासूमध्ये असलेला दुरावा दूर करताना स्वत:चे कुटुंब विस्कटले जाऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. सासू-सून या विषयावर अनेक मालिका विविध वाहिन्यांवर होत असल्या तरी ही मालिका वेगळी आणि महिलांच्या जिव्हाळ्याची आहे. जावई म्हणून एखादा कुटुंबात राहत असताना त्याला कुठली कामे करावी लागतात ती या मालिकेत करण्यात आली आहेत. सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाल्यामुळे जावई झालो आहे. त्यामुळे तो प्रत्यक्ष जीवनातील अनुभव पाठीशी असल्यामुळे या मालिकेत त्याचा उपयोग होत आहे. छोटय़ा मालिकेत भूमिका करताना मोठय़ा पडद्यावर काम मिळेल, अशी अपेक्षा ठेवणे वाईट नाही. मात्र, सध्या मालिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. नच बलिये या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घरोघरी पोहचल्यावर रसिकांना माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे या मालिकेतील माझी भूमिका लोकांना आवडेल, असा विश्वास आहे. अभिनेता म्हणून जगण्यापेक्षा एक माणूस म्हणून कसे जगता येईल याचा नेहमी विचार करीत आलो आहे. या क्षेत्रात येण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. कोणी गॉडफादर नव्हते. प्रारंभीच्या काळात जाहिरातीमघ्ये मॉडेल म्हणून काम करीत असताना मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळत गेली आणि त्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आज समाधानी आहे. चांगला परिवार मिळण्यापेक्षा आपण त्या परिवाराला कसे सांभाळू शकतो व कशी त्यांची मने जिंकू शकतो असा विचार प्रत्येत युवतीने केला पाहिजे. रंगमंचावर काम करण्याची इच्छा आहे. मात्र, संधी मिळाली नाही. रंगभूमी हा अभिनयाचा पाया आहे त्यामुळे नाटकात काम करण्याची संधी मिळाली तर नक्की त्यात काम करणार असल्याचे रवी दुबे यांनी सांगितले.