कुठल्याही कलाक्षेत्रात कलाकाराला आपल्या कलेसाठी आर्थिक फायदा हवा असतो. त्याप्रमाणेच आपल्याला कलाकार म्हणून ओळखलं जावं, ही त्यांची इच्छा असते. लेखकांनाही आपल्या लेखनासाठी प्रसिद्धी हवी असते. मात्र बऱ्याचदा ती मिळत नाही. कलाकार, दिग्दर्शक हे चित्रपटाचे चेहरे असतात ते कायम लोकांसमोर असतात. लेखक हा नेहमीच पडद्यामागचा कलाकार आहे. पण कित्येकदा चित्रपटाच्या किंवा मालिकांच्या सेटवर कलाकारांनाही संबंधित लेखक कोण याचा पत्ता नसतो, हे पाहून वाईट वाटते. विजय पाटकर यांच्या निर्णयामुळे चित्रपटाच्या पोस्टरवरही लेखकांचा उल्लेख झाला तर त्यांनाही सुरुवातीपासूनच प्रसिद्धी मिळेल. अर्थात ही सुरुवात आहे. मात्र अशा कित्येक चुकीच्या प्रथा, पायंडे आज इंडस्ट्रीत पडले आहेत ते काढून टाकण्यावर आमचा भर आहे. मराठी चित्रपटांचा दर्जा चांगला आहे, निर्मातेही काहीएक विचाराने या चित्रपट व्यवसायाकडे पाहतात. त्यामुळे, कदाचित लेखकांना मानधनासाठी नव्वद दिवसांची वाट पाहावी लागणे असेल किंवा पोस्टरवर त्यांचा नामोल्लेख नसणे असे वर्षांनुर्वष चालत आलेले प्रकार, त्यामुळे लेखकांना येणाऱ्या अडचणी निर्मात्यांपर्यंत तेवढय़ा प्रकर्षांने पोहोचल्या नसतील. ते त्यांच्यापर्यंत पोहोचावेत आणि सामोपचाराने एकमेकांशी चर्चेतून लेखकांसाठी सकारात्मक वातावरण तयार करणे हा आमचा उद्देश आहे.