बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन गोष्टी भारतीयांच्या फार जवळच्या आहेत. बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर यांच्यातली मैत्रीही फार घनिष्ट असते. काहींच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊन पुढे ते विवाह बंधनात अडकतातही. याचे ताजे उदाहरण म्हणजे झहीर खान आणि सागरिका घाटगे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नबंधनात अडकले. अतिशय शांत स्वभाव असलेला झहीर आणि त्याच्या अगदी उलट असलेली सागरिका यांची प्रेमकहाणीसुद्धा रंजक आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातूनच आता या दोघांनी आपली ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘लग्नानंतरची स्टोरी’ चाहत्यांसमोर मांडली आहे.

सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली. त्यानंतर दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले. मात्र, या दोघांनीही कोणालाच त्यांच्या प्रेमप्रकरणाची कानोकान खबर लागू दिली नाही. इथपासून ते लग्नासाठी कशाप्रकारे तयारी करण्यात आली, या सर्व गोष्टी झहीर- सागरिकाने या व्हिडिओमार्फत सांगितल्या.

सागरिकाच्या वडिलांशी झहीरची पहिली भेट कशी होती, लग्नानंतर सागरिकाचे आयुष्य कशाप्रकारे बदलले याबद्दल तिने बऱ्याच गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. तर झहीरनेही काही रंजक किस्से सांगितले. झहीर- सागरिकाची ‘प्रेमाची गोष्ट’ या व्हिडिओतून उलगडताना दिसते.