“एकच राजे… शिव छत्रपती माझे” हा जयघोष संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यांना मानवंदना देण्यासाठी झी टॉकीजने एका खास सांगीतिक मैफिलीचे प्रायोजन केलं आहे. या कार्यक्रमात महाराजांवर आधारित फत्तेशिकस्त या चित्रपटाच्या मेकिंगच्या काही अविस्मरणीय आठवणींनासुद्धा उजाळा मिळणार आहे. ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

या सांगीतिक मैफिलीमध्ये पोवाडा, नृत्य, वादन अशा विविध कला सादर केल्या जाणार आहेत. लता मंगेशकर, अजय-अतुल, आदर्श शिंदे, उषा मंगेशकर आणि कुणाल गांजावाला यांच्यासारख्या नामांकित गायकांचे गायन होणार आहे. या व्यतिरिक्त, सिद्धार्थ जाधव, वैभव तत्त्ववादी, वैदेही परशुरामी या लोकप्रिय कलाकारांचा बहारदार नृत्याविष्कार सादर होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या पोवाड्यांची झलक झी टॉकीजच्या प्रेक्षकांना मिळणार आहे. नंदेश उमप आणि शाहीर देवानंद माळी आपल्या खास शैलीत पोवाडा सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तसंच या कार्यक्रमात प्रेक्षकांना फत्तेशिकस्तच्या कलाकारांकडून शूटिंग दरम्यानचे काही किस्से आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याकडून महाराजांच्या इतिहासातील काही घटना ऐकायला मिळतील. फत्तेशिकस्त हा चित्रपट कसा घडला आणि त्यासाठी कलाकारांनी केलेली मेहनतदेखील प्रेक्षक पाहू शकतील.