बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि अवघ्या काही दिवसांतच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली पकड घेतली. जगभरात या चित्रपटाच्या कमाईचा आकडा हा ३५० कोटीच्या पलीकडे गेला आहे आणि भारतात या चित्रपटाने २०० कोटीचा गल्ला केला आहे. पण या चित्रपटाच्या विरोधात सातत्याने सोशल मीडियावर बोललं जात आहे. चित्रपटाची खरी आकडेवारी लपवली जात आहे असंही म्हंटलं जात आहे.

अभिनेत्री कंगना रणौतनेही या चित्रपटाच्या कमाइच्या आकड्याबद्दल शंका व्यक्त केली होती. कंगना म्हणाली की ६५० कोटी बजेट असलेल्या चित्रपटाने ४५० कोटी कमावले म्हणजे तो चित्रपट हिट ठरत नाही. केवळ कंगनाच नाही तर या चित्रपटाच्या कमाईबद्दल अजूनही बऱ्याच लोकांना शंका आहे. यासंदर्भात मला करण जोहरची मुलाखत घ्यायची आहे अशी मागणी कंगनाने केली होती.

आणखी वाचा : Photos : बॉलिवूडचं नुकसान भरून निघणार? येत्या काळात हे मोठे चित्रपट ३ भागात पाहायला मिळणार, जाणून घ्या

कंगनाच्या याच वक्तव्यावर नुकतंच अभिनेता रणबीर कपूरने स्पष्टीकरण दिलं आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या दिग्दर्शकाची बाजू आणि चित्रपटाचं गणित मांडून रणबीर म्हणाला, “सध्या बरीच लोकं ब्रह्मास्त्रच्या बजेटविषयी आणि कमाईच्या आकड्याविषयी चर्चा करत आहेत, प्रश्न विचारत आहेत. या चित्रपटाचं जे बजेट तुमच्यासमोर आलं आहे ते एकाच भागासाठी नसून याच्या तिनही भागांवर आवश्यक तेवढा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे कमाईबद्दल किंवा बजेटबद्दल बाहेर येणारे आकडे हे धादांत खोटे आहेत. ‘ब्रह्मास्त्र’चं गणित इतर चित्रपटांच्या गणितापेक्षा बरंच वेगळं आहे.”

बऱ्याच काळानंतर ‘ब्रह्मास्त्र’सारख्या हिंदी चित्रपटाला एवढं घवघवीत यश मिळालं आहे. हा चित्रपट ५ विविध भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. बॉयकॉट ट्रेंड व्हायरल असतानाही या चित्रपटाला मिळालेलं हे यश अभूतपूर्व आहे, प्रेक्षकांना आता याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे.