भारतात चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षक पाठ फिरवत आहेत, मात्र आजही मराठी प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहांमध्ये गर्दी करीत आहेत, अशा शब्दांत कौतुक करत ही नाट्यसंस्कृती अशीच टिकली पाहिजे, अशी प्राजंळ अपेक्षा ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते संजय मिश्रा यांनी व्यक्त केली.

मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान ठरलेले, विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आता हिंदी भाषेत रंगभूमीवर येणार आहे. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते संजय मिश्रा यांनी नाना फडणवीस आणि अभिनेता संतोष जुवेकर याने घाशीराम कोतवाल ही भूमिका साकारली आहे. या नाटकाच्या निमित्ताने ३० वर्षांनी संजय मिश्रा रंगभूमीवर पुनरागमन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय मिश्रा यांनी मनमोकळा संवाद साधत विविध आठवणींना उजाळा दिला.

‘मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा – एनएसडी) असताना ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक पहिल्यांदा पाहिले होते. तेव्हापासूनच या नाटकाबद्दल उत्सुकता होती. मी चित्रपटात व्यग्र होतो, पण नाटक करण्याची सुरुवातीपासूनच इच्छा होती. ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक भारतीय नाट्यसृष्टीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण असे दर्जेदार नाटक आहे. त्यामुळे मी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकात काम करण्यास तात्काळ होकार दिला’ असे संजय यांनी सांगितले. या नाटकासाठी सर्व कलाकारांसह नृत्यांगना, नर्तक व गायकही मेहनत घेत असून उत्तम काम करत आहेत. चित्रपटात अभिनय करणे ही माझी आवड आहे. त्यातून पैसा व प्रसिद्धीही मिळते. मात्र नाटकात काम करताना एक वेगळा अनुभव व समाधान मिळत आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

हिंदीतील ‘घासीराम कोतवाल’ नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी केले आहे, तर वसंत देव यांनी हिंदी भाषेत संहितेचे लेखन केले होते. निर्मिती आकांक्षा ओमकार माळी आणि अनिता पालांडे यांच्या ‘३३ एएम स्टुडिओ’ने केली आहे. नाटकात संजय मिश्रा, संतोष जुवेकर, ऊर्मिला कानेटकर यांच्यासह ६० कलाकार पाहायला मिळणार आहेत. ‘घासीराम कोतवाल’ हिंदी नाटकाचे संगीत मंदार देशपांडे यांनी केले आहे, विशेष बाब म्हणजे नाटकातील कव्वाली उर्दू भाषेत व लावणी मराठी भाषेतच ऐकायला मिळणार आहे. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे, नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर, प्रकाशयोजना हर्षवर्धन पाठक, वेशभूषा चैताली डोंगरे व बळवंत काजरोळकर यांनी केली आहे. या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अभिनयाच्या जुगलबंदीसह प्रत्यक्ष स्वरूपात सांगीतिक व नृत्याविष्कार पाहायला मिळेल. या नाटकासाठी संजय मिश्रा यांनी विशेष मेहनत घेतली असून मराठीतील शब्दांचे अर्थही सहकाऱ्यांकडून जाणून घेतले आहेत.

तालमीदरम्यानच्या आठवणी सांगताना संजय मिश्रा म्हणाले, ‘आमच्या नाटकाचा समूह संपूर्ण मराठी आहे, ही माझ्यासाठी जमेची बाजू आहे. प्रत्येक व्यक्तीकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत. अनेकजण स्वत: येऊन सांगत आहेत आणि मीही संबंधित उपयुक्त गोष्टी जाणून घेत आहे, त्यामुळे सादरीकरण करताना प्रचंड फायदा होतो. तसेच मी वास्तवदर्शी कलाकार आहे. माझ्याकडून भूमिकेची मर्यादा ओलांडली जात नाही ना? या संदर्भात तालीम सुरू असताना दिग्दर्शकांकडून खातरजमा करून घेतो. ‘नाना फडणवीस’ ही भूमिका मोहन आगाशे यांनी अतिशय उत्तमरीत्या साकारली होती, त्यामुळे त्यांच्यासमोर सादरीकरण करताना मनात भीतीही असेल’.

‘घाशीराम कोतवाल’ हे मराठी रंगभूमीवरील अभिजात नाटक आहे. मी विविध मराठी नाटके पाहिलेली आहेत. मराठी प्रेक्षकांनी अजूनही नाट्यसंस्कृती टिकवून ठेवली असून त्यांना माझा सलाम आहे. एकीकडे भारतात चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षक पाठ फिरवत आहेत, तर दुसरीकडे मराठी प्रेक्षक मराठी नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहांमध्ये अजूनही गर्दी करीत आहेत, ही नाट्यसंस्कृती अशीच टिकली पाहिजे, असे संजय मिश्रा यांनी सांगितले. मराठी नाटकांबरोबरच मराठी गाणीही ऐकतो, असे सांगत आपल्याकडे बालगंधर्व, कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी यांच्या गाण्यांचा खजिना (रेकॉर्डस्) असून आजही त्यांची गाणी ऐकत असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘घाशीराम कोतवाल’ नाटकात महाराष्ट्राची संस्कृती प्रतिबिंबित होते आणि मला हे नाटक देशाच्या कानाकोपऱ्यासह जागतिक स्तरावरही न्यायचे आहे’, असा मानसही संजय मिश्रा यांनी व्यक्त केला.

इतरही कलाकृती, इतर भाषांमध्ये ‘मला ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक पाहायला मिळाले नव्हते, परंतु मी नाटकासंदर्भातील चर्चा तसेच लिखाण वाचले आहे. हे नाटक कालसुसंगत असून कधीही जुने होऊ शकत नाही. या नाटकातून करण्यात आलेले राजकीय भाष्य सार्वकालिक आहे. मराठीत दर्जेदार कलाकृती निर्माण झाल्या, मात्र मराठी साहित्य तसेच नाटके इतर भाषांत रूपांतरित करून अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कुठेतरी कमी पडलो आहोत, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.

आजच्या पिढीला समजण्यासाठी सादरीकरणात सहजपणा

‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील दर्जेदार व महत्त्वाचे नाटक आहे. या नाटकातील कोणतीही भूमिका साकारायला एक अनुभव लागतो. हे नाटक आजच्या पिढीला आपलेसे वाटावे यासाठी मी विशेष मेहनत घेत आहे. मी जे काही बोलत आहे, हे तुम्हाला समजते का? असे मी माझ्या दोन मुलींना वारंवार विचारतो. या मुलांना नृत्य व गीते समजतील, पण कथानक समजणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एकंदरीत आजच्या पिढीला नाटकाचा गाभा समजण्यासाठी थोडे सहज व सोप्या पद्धतीने सादरीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या सगळ्यामध्ये विजय तेंडुलकर यांनी नाटकाची केलेली रचनाही सांभाळण्याचा आमचा प्रयत्न आहे, कारण नाटकाच्या मूळ गाभ्याशी छेडछाड केल्यास नाटकातील अस्सलपणा निघून जाईल, असे स्पष्ट मत संजय मिश्रा यांनी व्यक्त केले.

नाना फडणवीस ही भूमिका फार वास्तवदर्शी

‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचे अनेकदा वाचन केल्यानंतर नाना फडणवीस या भूमिकेचे विविध पैलू उलगडत गेले आणि क्षणाक्षणाला भूमिका नीट समजत गेली, बारकावे कळले. नाना फडणवीस ही भूमिका फार वास्तवदर्शी आहे. समाजातील विविध गोष्टी आणि स्वभाववैशिष्ट्ये नानांच्या भूमिकेत आढळतात. त्यामुळे ही भूमिका रंगमंचावर अधिक वास्तवदर्शी करण्याचा माझा प्रयत्न असेल, जेणेकरून प्रेक्षक संबंधित काळाशी जोडले जातील, असे संजय मिश्रा यांनी सांगितले.

प्रयोग कधी?

हिंदी भाषेतील ‘घासीराम कोतवाल’ नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग मुंबईतील वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे १४ व १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता होणार आहेत. त्यानंतर नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’च्या टाटा थिएटरमध्ये २२ व २३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता प्रयोग सादर होणार आहे.