‘हिमालयाची सावली’मध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार बयोची भूमिका

‘अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही आव्हानात्मक भूमिका आहे’

‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्य कलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी त्या पुन्हा पुन्हा पाहाव्याशा वाटतात. म्हणून कदाचित असंच एक गाजलेलं लोकप्रिय नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीने सजलेल्या आणि डॉ. श्रीराम लागू ,शांता जोग, अशोक सराफ या कलाकारांच्या उत्तम अभिनयाच्या अदाकारीने गाजलेल्या ‘हिमालयाची सावली’ हे नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या नाटकाची जबाबदारी राजेश देशपांडे यांनी घेतली असून ते ‘हिमालयाची सावली’चं दिग्दर्शन करणार आहेत. या नाटकामध्ये अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई ‘बयो’ या व्यक्तीरेखा साकारणार आहे.

१९७२ साली आलेल्या ‘हिमालयाची सावली’ या नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग यांच्या अभिनयाने सजलेली ‘बयो’ ही व्यक्तीरेखा शृजा साकारणार आहे. अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र, ‘बयो’ या व्यक्तिरेखेतून ती एका वेगळ्या रुपात रंगमंचावर दिसणार आहे. या नाटकात तिच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षेदेखील झळकणार असून ते नानासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही आव्हानात्मक भूमिका आहे. या व्यक्तीरेखेचे वेगवेगळे कंगोरे साकारण्यात आव्हान असले तरी या व्यक्तीरेखेतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. माझ्या वयापेक्षा अधिक वयाची ही भूमिका असल्याने त्यासाठी आवश्यक भाव, देहबोली या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही भूमिका करायची होती. बयो आणि मी स्वतः कोकणातली असल्यामुळे तिची भाषा आणि लकबी पकडणं मला सोयीचं होत आहे. नाट्यरसिकांना ही भूमिका आवडेल, असं शृजा म्हणाली.

प्रा.वसंत कानेटकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये रविवार २९ सप्टेंबरला ‘हिमालयाची सावली’ नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. या नाटकात ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडकर, ओमकार कर्वे, कृष्णा राजशेखर, प्रकाश साबळे, मकरंद नवघरे, वासंतिका वाळके, पंकज खामकर यांच्या भूमिका आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress shruja prabhudesai on stage himalayachi sawali ssj

ताज्या बातम्या