सुप्रिया पाठारे, अभिनेत्री
वाचन ही माझ्यासाठी एक शिकण्याची प्रक्रिया आहे. एखादा विषय शिकण्यासाठी किंवा एखाद्या विषयाबद्दल माहिती करून घेण्यासाठी मी वाचन करते. लहानपणी चंपक, चांदोबा अशा बालसाहित्यापासून सुरु झालेला हा वाचनाचा प्रवास अजूनही सुरूच आहे. वाचनामुळे विविध अभिरुची संपन्न वाङ्मयीन कलाकृतींचा सहवास घडला. त्यामुळे माझे जीवन समृद्ध झाले, असे मी मानते.
मला पुस्तके वाचायला आवडत असली तरी मी काही नियमित वाचक नाही. खास वेळ काढून मी कधीही वाचन करीत नाही. मात्र माझ्यासोबत नेहमी एखादे पुस्तक असते. त्यामुळे दैनंदिन कामातून थोडी उसंत मिळाली की मी पुस्तक उघडून वाचू लागते. आता चित्रपट, नाटक अथवा मालिकांचे विषय, त्यातील मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी मला अनेकदा वाचन उपयोगी पडते. शाळेत मी खूप कमी वाचले. मात्र जे वाचले त्याचा प्रभाव पुढील आयुष्यात कायम राहिला. मला आठवतेय, नववीत असताना मी स्त्री भ्रूणहत्येवर माझे पहिले नाटक केले. त्या वयात स्त्री भ्रूणहत्या म्हणजे काय हेही मला माहिती नव्हते. त्यामुळे तो विषय समजवून घेण्यासाठी मी विविध पुस्तके, नियतकालिके वाचली. त्या संदर्भातून मी ते नाटक लिहिले. महाविद्यालयीन जीवनात मी खूप नाटके केली. त्यामुळे या काळात अवांतर वाचनासाठी फारसा वेळ मिळाला नाही. व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागल्यापासून पुन्हा वाचन सुरू झाले. अतिशा नाईक, श्रद्धा केतकर आणि माधवी सोमण अशा काही माझ्या वाचक सहकलाकारांनी अनेक चांगली पुस्तके सुचवली. बेटी मेहेमुदी यांनी विल्यम हॉफर या सहलेखकासोबत लिहिलेले ‘नॉट विदाऊट माय डॉटर, सिक्रेट, स्त्रियांच्या जीवनातील भयानक वास्तव मांडणारे ?????? भरती ??????? पांडे यांनी मराठीत अनुवादित केलेले तेहमिना दुर्रानी यांचे ब्लास्फेमी, रणजित देसाई यांचे राधेय, विश्वास पाटील यांच्या ‘पानिपत’, ‘महानायक’ या कांदबऱ्या मला खूप आवडल्या. मला लघुकथा वाचायला खूप आवडतात. नारायण धारप लिखित भुकेली रात्र, चेतन, फेरिस्ता, रत्नाकर मतकरी यांचे माणसाच्या गोष्टी, गहिरे पाणी अशी गूढकथेची पुस्तकेही मी वाचली आहेत. मला कुकरीची पुस्तकेसुद्धा वाचायला खूप आवडतात. वि.वा.शिरवाडकर लिखित जान्हवी, कैकयी, ययाती आणि देवयानी, पु.ल.देशपांडे यांची बटाटय़ाची चाळ, असा मी असामी, झेंडूची फुले, शापित प्रतिभावंत ही आचार्य अत्रे यांची पुस्तकेही मी वाचली आहेत. विजया पाटील यांचे सेकंद सेकंद आदी पुस्तके मी वाचली आहेत. त्यातील काही माझ्या संग्रहीसुद्धा आहेत. मला कुणी एखादे पुस्तक सुचविले की मी त्याचे नाव लिहून घेते. वाचनालयातून आणून वाचते किंवा विकत घेते. डॉ.यू.म.पठाण यांचे लेक सावित्रीची, गोपाळ गोडसे यांचे ५५ कोटींचे बळी, स्वर्णलता भिशीकर यांचे युगनायक, साधना आमटे यांचे ‘समिधा’ ही पुस्तकेही मी वाचली आहेत. मी माझ्याकडची पुस्तके फारशी शेअर करीत नाही. लाल देशमुख यांनी दिलेले साद देती हिमशिखरे, सुहिता थत्ते यांनी दिलेलं गुरुदत्त, हरिमोहन परवू यांनी दिलेले त्यांचं स्वत:चं पुस्तक ‘द मेन विदीन अ क्रिकेटिंग टेल’ असे एकतर्फी शेअरिंग माझ्याबरोबर खूप वेळा झालं आहे. पुस्तकांबरोबरच मला माझ्या कार्यक्रमाच्या संहिता जपून ठेवायला खूप आवडतं. यळकोट, फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन या रिअॅलिटी शोज्मधील अनेक संहिता माझ्या संग्रही आहेत.
आता काळानुरूप वाचनाची माध्यमे बदलली आहेत. फेसबुक, व्हॉटस्अप, ई-बुक्स, किंडेल आदी आधुनिक माध्यमे उपलब्ध आहेत. गरज, आवड आणि ऐपतीनुसार प्रत्येकाने ती वापरावीत. मात्र वाचन सोडू नये, असे मी सांगेन. कारण शाळा-महाविद्यालयानंतर थांबलेली शिक्षणाची प्रक्रिया फक्त आणि फक्त वाचनामुळेच पुढे सुरू राहते. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडत असते. त्यामुळे स्वत:ला वैचारिकदृष्टय़ा समृद्ध करून घेण्यासाठी वाचत राहणे आवश्यक असते.
शब्दांकन- जतीन तावडे