मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा दिवसेंदिवस वाढताना सध्या दिसतो आहे. आधी मराठीतील कलाकार बॉलीवूडमध्ये गेले की त्याची चर्चा व्हायची. पण आता तर चक्क बॉलीवूड सेलिब्रिटिच मराठी चित्रपटात हजेरी लावताना दिसतायतं. रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ चित्रपटात बॉलीवूडचा दबंग खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे आपल्या बोल्ड अदांनी घायाळ करणारी अदिती राव हैदरी ही मृणाल कुलकर्णीच्या आगामी ‘रमा माधव’ चित्रपटात मुजरा करताना दिसेल. बॉलीवूडमध्ये बोल्ड अवतारामध्ये दिसणारी अदिती ‘रमा माधव’मध्ये मात्र पारंपारिक पोषाख आणि अंगभर दागिन्यांमध्ये दिसेल.
‘रमा माधव’मधून मृणाल एक ऐतिहासिक प्रेमकथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान या आदिती राव हैदरीवरील गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करणार आहेत. या गाण्याबाबत बोलताना मृणाल म्हणाली, जेव्हा मी चित्रपटात मुजरा चित्रीत करायचे ठरवले त्यावेळेस सरोज खान यांना नृत्यदिग्दर्शन करण्याची मी विनंती केली. मुज-यासाठी आमच्या डोक्यात अनेक नाव होती. पण, त्यांनी आम्हाला अदितीचं नाव सुचवलं. अदिती आणि सरोजजींनी सलग सहा ते सात दिवस गाण्यासाठी सराव केला. सरोजजींनी तिला काही खास अदाही शिकवल्या असून, केवळ एका रात्रीत या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले.
‘लूट लियो मोहे शाम सावरे बरबात जमुना किनारे’ असे या मुज-याचे बोल असून, वैभव जोशीने तो लिहिला आहे. आनंद मोडक यांनी संगीत दिलेल्या या गाण्यास ‘सारेगमप’ची विजेती मधुरा दातारने गायले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi rao hydaris classical dance in ramaa madha
First published on: 02-07-2014 at 01:05 IST