#MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाच्या प्रकरणांविषयी व्यक्त होत आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी भाष्य केलं आहे. तर दुसरीकडे या मोहिमेचा गैरवापरही होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ऐश्वर्या राय -बच्चनच्या नावाने एक फेक ट्विट व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वीची ऐश्वर्याने #MeToo प्रकरणावर जाहीरपणे तिचं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर काही काळातच सोशल मीडियावर तिच्या नावाची एक ट्विटर पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये तिने बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्यावर अप्रत्यक्षरित्या आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे व्हायरल होत असलेली ही पोस्ट ऐश्वर्याची नसून तिच्या नावाने एक फेक अकाऊंट तयार करण्यात आल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेली फेक पोस्ट @TheGuruGhantal या ट्विटर युजर्सच्या प्रोफाईलमधून शेअर करण्यात आली असून यात ‘ह्युमन’ या शब्दाचा उल्लेख करत अभिनेता सलमान खानला टार्गेट करण्यात आल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, बॉलिवूडचं ऐश्वर्य समजल्या जाणाऱ्या ऐश्वर्याचा सोशल मीडियावर तसा फारसा वावर नसतो. काही दिवसापूर्वीच तिने इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं होतं. परंतु आजही तिचं ट्विटरवर कोणतंही अधिकृत खातं नाही. त्यामुळे #MeToo या मोहिमेचा अनेक जण गैरफायदा घेत अफवा पसरवत असल्याचं समोर आलं आहे.